वॉशिंग्टन :
अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये ८ एप्रिलला खग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. यावेळी काही मिनिटांसाठी अंधार पडल्यावर अमेरिकन अवकाश संशोधन संस्था (नासा) तीन रॉकेट सोडणार आहे. हे तिन्ही रॉकेट ग्रहणाच्या छायेत लाँच केले जातील. सूर्याचा प्रकाश अचानक कमी झाल्यावर वातावरणावर कोणता परिणाम होतो, हे यामधून पाहिले जाईल. विशेषतः, वातावरणाच्या वरच्या आणि खालच्या स्तरादरम्यान असलेल्या आयनमंडळावर होणारा परिणाम या प्रयोगातून अभ्यासला जाईल.
सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एकाच सरळ रेषेत आल्यावर सूर्य झाकला जातो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडून असा अंधार पडतो की दिवसाच्या वेळीच अचानक रात्र झाल्यासारखी वाटते. तापमानातही वेगाने घट होते. पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या स्तरावर सूर्यग्रहणाच्या या छायेचा कोणता परिणाम होतो, हे अद्याप समजलेले नाही. या प्रयोगातून पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या आणि खालच्या स्तरांमधील सीमारेषेवर कोणता प्रभाव पडतो हे जाणून घेतले जाईल.