मुंबई- माजी केंद्रिय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची हत्या झाली, असा दावा करत याबाबतचा पुरावाही असल्याचे ठामपणे म्हटले. त्यानंतर कालच सीबीआयने या प्रकरणाचा अंतिम अहवाल सादर केला. या अहवालात सीबीआयने स्पष्ट म्हटले की, सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्याच केली आहे. यानंतर आता नारायण राणे सुशांतसिंह प्रकरणातील प्रत्यक्ष साक्षीदार असलेला सावंत याला हजर करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
दिशा सालियन हिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात अर्ज करून आपल्या कन्येवर अत्याचार होऊन तिचा खून करण्यात आला असा दावा केला. यात उबाठा नेते आदित्य ठाकरे यांचे नाव घेण्यात आल्याने खळबळ माजली. त्यानंतर अचानक नारायण राणे यांनी पत्रकार परिषद जाहीर केली. अनेक महिन्यांनंतर नारायण राणे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी भाजपा कार्यालयात उपस्थित झाले होते. या पत्रकार परिषदेवेळी भाजपाचे प्रवक्ते ओमप्रकाश चौहान हेही उपस्थित होते. ही भाजपा पक्षाच्या नेत्याची अधिकृत पत्रकार परिषद होती.
या पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले की, मी 20-22 विषयांचा अभ्यास करून आलो आहे. महाराष्ट्रात सध्याचे जे राजकारण सुरू आहे त्याबद्दल मला कोणताही प्रश्न विचारा. मी विचार केल्याशिवाय कुठलीही गोष्ट बाहेर बोलत नाही. यानंतर त्यांनी दिशा सालियन प्रकरणात पुरावे असल्याचा दावा केला. पोलिसांकडे पुरावे आहेत ते त्यांनी मांडावेत. आम्ही साक्ष का द्यायची म्हणूनच नितेश राणे यांनी 2023 साली या प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटी समोर साक्ष दिली आहे. असेही नारायण राणे यांनी सांगितले.
याच पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले की, सुशांतसिंह राजपूत याची हत्या झाली आहे. याचे पुरावेही आहेत. त्याचा नोकर सावंत याने सुशांतला गळफास लागतानाचा व्हिडिओ घेतला होता. हा सावंत खेरवाडीत राहतो. पोलिसांनी त्याची साक्ष का घेतली नाही? नारायण राणे यांच्यासारख्या जबाबदार नेत्याने पूर्ण अभ्यास करून घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा दावा केला आहे. मात्र त्यानंतर सीबीआयने जो अंतिम अहवाल दिला. त्यात स्पष्ट म्हटले आहे की, सुशांतच्या मृत्यूत कोणतेही काळेबेरे नाही. त्याने आत्महत्याच केली होती. कोणाच्याही दबावामुळे ही आत्महत्या केलेली नाही. रिया चक्रवर्ती हिचाही या प्रकरणात कोणताही हात नाही. ती
निर्दोष आहे. सीबीआयने पूर्ण चौकशीअंती सादर केलेल्या या अंतिम अहवालात सुशांतसिंह राजपूतचा खून झाल्याचा दावा पूर्णपणे फेटाळण्यात आला आहे. हा अहवाल न्यायालयाने मान्य केला तर सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण कायमचे फायलीत बंद होईल. मात्र नारायण राणे यांनी सुशांतची हत्या झाल्याचा पुरावा असल्याचे म्हटले आहे. सुशांतचा नोकर सावंत हा या हत्येचा प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचे म्हटले आहे. यामुळे नारायण राणे आता नोकर सावंत याची माहिती सीबीआय आणि न्यायालयाला देणार का? हा सवाल आहे. भाजपाच्या नेत्याने केलेल्या या दाव्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया काय आहे? याबद्दलही उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातच उद्या दिशा सालयिन प्रकरणी न्यायालयात सुनावणी होणार आहे?
