सुप्रिया सुळे यांनी स्वतःच उमेदवारी जाहीर केली

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडून बारामती मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली जाईल, हे जवळपास निश्चित आहे. मात्र, महाविकास आघाडीतील घटक पक्षांची जागावाटपाची खलबते अद्याप सुरूच आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. असे असताना सुप्रिया सुळे यांनी आज व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवून बारामती लोकसभा मतदारसंघात स्वतःची उमेदवारी स्वतःच जाहीर केली.
सप्रिया सुळे यांनी ठेवलेले व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस हा त्यांचा प्रचारच आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ असे लिहून डाव्या बाजूला शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडीतील मुख्य घटक पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांचे फोटो आहेत. त्याखाली सुप्रिया सुळे उमेदवाराचे नाव असे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि तुतारी वाजविणारा माणूस हे पक्ष चिन्ह आहे. त्यामुळे आता सुळे यांची उमेदवारी नक्की झाली आहे .
सुप्रिया सुळे यांच्या या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. बारामती मतदारसंघातून त्या यापूर्वी तीन वेळा निवडून आल्या आहेत. त्या विद्यमान खासदारही आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर होत असलेली ही लोकसभेची पहिलीच निवडणूक त्यांच्यासाठी खूप आव्हानात्मक ठरणार आहे. पक्षात बंडखोरी केलेले अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्यासमोर उमेदवार म्हणून उतरविण्याचे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे पवार कुटुंबातच ही लढाई होणार आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोघांसाठी बारामती मतदारसंघातील लढत प्रतिष्ठेची ठरत आहे. दुसरीकडे सुनेत्रा पवार गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघ पिंजून काढत आहेत.
गावोगावी जाऊन पदाधिकार्‍यांच्या भेटी-गाठी घेत आहेत. जाहीर कार्यक्रमही आयोजित करत आहेत. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून स्वतःची उमेदवारी स्वतःच जाहीर करून प्रचाराचा धडाका लावणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top