सीबीएसई 11 वी-12 वी परीक्षा पद्धतीत बदल

पुणे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) परीक्षा पद्धतीत बदल करण्यात येणार आहे. सीबीएसईने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) 2020 अंतर्गत मूल्यमापन पद्धतीत बदल करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. याअंतर्गत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 11वी आणि 12वीच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यात मल्टिपल चॉईस क्वेश्चन (एमसीक्यू) म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पद्धतीच्या प्रश्नावर भर दिला जाणार आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हा सीबीएसई परीक्षेचा नवा पॅटर्न 2025 पासून लागू होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांतील संकल्पनांची स्पष्टता यावी आणि त्यासाठी त्यांच्यात आवश्यक क्षमता विकसित व्हावी, यावर भर देणारे प्रश्न अधिक विचारले जाणार आहेत. रट्टा मारून लक्षात ठेवलेल्या ज्ञानावरील आधारित प्रश्न कमी केले आहेत. इयत्ता 11वी आणि 12वी बोर्ड परीक्षांमध्ये, मुलांना मोठमोठ्या उत्तरांचा भार वाटू नये म्हणून बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू), केस स्टडी आधारित प्रश्न, स्त्रोत आधारित एकात्मिक प्रश्न किंवा इतर तत्सम प्रश्नांचे प्रमाण 40 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आले आहे. त्याचबरोबर, 2024-25 शैक्षणिक सत्रात पारंपरिक परीक्षा पद्धतीच्या लहान उत्तर/दीर्घ उत्तरांच्या प्रश्नांचे प्रमाण 40 टक्क्यांवरून 30 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. प्रतिसाद प्रकारच्या प्रश्नांचे प्रमाण पूर्वीप्रमाणेच 20 टक्के राहील.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (2020) अनुषंगाने सीबीएसईने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यानुसार शाळांमध्ये क्षमतेवर आधारित शिक्षणावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये नावीन्य, क्रिटिकल आणि सिस्टिम थिंकिंग निर्माण व्हावी, त्यादृष्टीने बदल करण्यात येत आहेत. 11वी-12वीच्या परीक्षेत वास्तविक जीवनातील संकल्पनांच्या वापराचे मूल्यांकन करण्यासाठी आवश्यक त्या क्षमतेवर आधारित प्रश्नांची टक्केवारी वाढवली जाणार आहे, अशी माहिती सीबीएसईचे संचालक जोसेफ इमॅन्युअल यांनी दिली आहे. मंडळाने हा बदल स्पष्ट करण्यासाठी नवीन नमुना प्रश्नपत्रिकांचे संच प्रसिद्ध केले आहे. येणार्‍या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न राहतील तसेच मार्किंग सिस्टीम कशी असेल, याचा बोध या नमुन्यातून घेणे शक्य होईल. मंडळाच्या वेबसाईटवर क्वेश्चन बँक नावाच्या विभागात ही माहिती उपलब्ध आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top