सिटीलिंकच्या बससेवा कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

नाशिक

सिटीलिंकमधील बसचालकांनी पुकारलेल्या संपाचा आज पाचवा दिवस होता. बसचालकांच्या संपामुळे सिटीलिंक बससेवेला सुमारे ८० लाखांचा तोटा सहन करावा लागला. गुरुवारपासून सुरु असलेल्या या संपाचा अद्याप तोडगा न निघाल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आजही सिटीलिंकची बससेवा विस्कळीत होती. थकीत वेतन, पी एफ व ई एस आय रक्कम खात्यावर जमा होईपर्यंत संप मागे घेणार नाही, असा पवित्रा सिटी लिंक बस सेवा वाहकांनी घेतला आहे.

संपावर तोडगा काढण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने अजून किती दिवस संप सुरू राहणार याबाबत स्पष्टता नसल्याचे वाहकांनी सांगितले. त्यामुळे आजही तपोवन आणि नाशिकरोड डेपोतील अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. तपोवनातील सर्व १५० बस डेपोतच उभ्या होत्या. वाहन चालकांच्या संपामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी जास्तीचे भाडे देऊन पर्यायाने रिक्षासह इतर खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या संपावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, वेतन होत नसल्याने काही दिवसांपूर्वी सिटी लिंक बसच्या चालक आणि वाहक यांनी संप पुकारला होता. त्यावेळी आश्‍वासन मिळाल्याने संप स्थगित करण्यात आला होता. मात्र पुन्हा दोन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले. मासिक वेतन वेळेवर देण्यात यावे, दोन महिन्यांचे रखडलेले वेतन तत्काळ अदा करावे, पीएफ, ईएसआय वाहक यांच्या नावाने भरला जावा यासह इतर प्रलंबित मागण्यासाठी हे कामबंद आंदोलन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top