सांगली – कवठे महांकाळ तालुक्यातील घोरपडी फाट्याजवळ आज सकाळी एका मोटारीचा टायर फुटल्याने अपघात झाला. यामध्ये १ महिला जागीच ठार झाली, तर ३ जण गंभीर जखमी झाले.
अमोल वाडकर हे सांगलीहून रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून सोलापूरला नातेवाईकांसह निघाले होते.घोरपडी फाट्याजवळ त्यांच्या गाडीचा टायर अचानक फुटला. त्यामुळे वेगात असलेली कार कोलांट्या मारत सुमारे पाचशे फुटापर्यंत रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली. या अपघातात सुनीता कल्याणी यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्या जागीच ठार झाल्या. तर मोटारीतील सुशिला वाडकर, अमोल वाडकर, नीमा पोगले हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद केली असून, पोलीस अपघाताचा अधिक तपास करत आहेत.