नवी दिल्ली – दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हिमालयात २००० ते ४००० मीटर उंचीवर बर्फवृष्टी सुरू होते. मात्र यावेळी उत्तराखंडमधील सर्वात उंच तुंगानाथ मंदिर परिसरात अद्याप बर्फ पडलेला नाही. या मंदिराची समुद्रसपाटीपासून उंची सुमारे ४००० मीटर आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री या चारधामांचीदेखील हीच स्थिती आहे. या भागातील तापमान मैदानी प्रदेशासारखे आहे. मान्सूननंतर कमी पाऊस झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे तज्ञांनी सांगितले.हवामान खात्याच्या अहवालानुसार सप्टेंबरनंतर सरासरीपेक्षा ९० टक्के कमी पाऊस झाला होता. त्यानंतर तापमानात अचानक वाढ झाली. त्यामुळेच नोव्हेंबरमध्ये सुद्धा या भागात बर्फवृष्टी झालेली नाही.
उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये प्रदूषणामुळे धुके वाढले आहे. दिल्ली, सोनीपत, गाझियाबाद, आग्रासह अनेक भागात सकाळी ७ वाजता एक्युआय (वायू गुणवत्ता निर्देशांक) ३०० पेक्षा अधिक नोंदवला आहे. हवामान खात्यानुसार यावेळी पर्वतांमध्ये थंडी उशिरा सुरू होऊ शकते. कारण पश्चिमेकडील हवामानत बदल होत आहे. त्याच्या प्रभावामुळे उंच पर्वतांवर हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. यानंतर तापमानात हळूहळू घट होईल. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट झाल्याने बर्फवृष्टीची शक्यता वाढत आहे. त्याचा परिणाम सखल भागात पावसाच्या रूपातही दिसून येतो.