बडोदा – खाण व्यवसायासंदर्भातील, गुजरात सरकारचे अयोग्य धोरण, वेतनवाढ, अन्याय पद्धतीने खाणी बंद करणे या व अनेक प्रश्नांना दाद मागण्यासाठी दगडप्रक्रीया व खाण कामगार बेमुदत संपावर गेले आहेत. बडोदा जिल्ह्यातील देसार व सावली तालुक्यातील तब्बल १६०० खाणींमधील काम ठप्प झाले आहे. गुजरातच्या या खाण उद्योगात १० हजार कामगार थेट गुंतलेले आहेत.
खाण कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरु होती. त्यावर कोणताही तोडगा निघत नसल्यामुळे हा संप पुकारण्यात आला आहे. बडोदा जिल्ह्यातील देसार व सावली सह अनेक भागातील खाणउद्योग पूर्णपणे ठप्प झाला आहे.
तालुक्यातील उदालपूर ते बडोदा मार्गावर हजारो डंपर उभे राहिल्याने या मार्गावरील वाहतूकही प्रभावित झाली. गुजरात ब्लॅक स्टोन खाणउद्योग संघटनेच्या द्वारकेत झालेल्या बैठकीत या संपाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १ ऑक्टोबरच्या रात्रीपासूनच खाणी बंद करायला सुरुवात झाली. सरकारने काही खाणी तातडीने बंद केल्यामुळे त्याचप्रमाणे इतर अनेक न सुटलेल्या प्रश्नांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. मध्य गुजरातमधील सव्वाशे खाणी व खेडा, पंचमहाल व बडोदा जिल्ह्यातील अडीचशे दगडप्रक्रीया व खाण उद्योग पूर्णपणे बंद आहेत. या भागातील खाण उद्योग महत्त्वाचा असून तब्बल १० हजार कामगार या मध्ये प्रत्यक्ष गुंतलेले आहेत. या उद्योगावर अप्रत्यक्षरित्या अवलंबून असलेल्या हजारो लोकांचाही व्यवसाय ठप्प पडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कामगारांच्या वेतनातही वाढ झालेली नाही. त्यामुळे सध्याच्या महागाईच्या दिवसात आपले घर चालवणेही त्यांना कठीण झाले आहे.