मुंबई – समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा टप्पा येत्या महिनाभरात वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.या शेवटच्या टप्प्यातील मार्गाची आता अंतिम टप्प्यातील कामे सुरू असून ती पूर्ण करून हा ७६ किमी लांबीचा मार्ग सुरू होणार आहे.त्यामुळे समृद्धी महामार्गावरून मुंबई ते नागपूर असा सलग प्रवास करणे शक्य होणार आहे.
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर नागपूर येथून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर पोहोचणे शक्य होणार आहे. तसेच या महामार्गाचा संपूर्ण ७०१ किमी लांबीचा मार्ग वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी इगतपुरी ते आमने या शेवटच्या टप्प्यातील मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार होता. मात्र, या टप्प्यात अभियांत्रिकीच्या दृष्टीने किचकट असलेल्या खर्डी येथील दीड किमी लांबीच्या पुलाचे काम बाकी होते. आता या पुलाची कामे पूर्ण झाली असून केवळ अंतिम टप्प्यातील कामे सुरू आहेत. तसेच यापूर्वी या पुलाच्या ठिकाणी एका बाजूचा मार्ग सुरू करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न होता. मात्र, समृद्धी महामार्गाचा शेवट होतो त्या आमने येथून पुढे वडपे येथे जाण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रस्त्याचे काम अपूर्ण होते.या चार किमी लांबीच्या रस्त्यांची कामे जवळपास पूर्णत्वाच्या दिशेने निघाली असून केवळ अंतिम टप्प्यातील काही कामे बाकी आहे. येत्या महिनाभरात हा मार्ग सुरू करणे शक्य असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. नवीन सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर पुढील महिनाभरात या शेवटच्या टप्प्यातील मार्गाचे लोकार्पण केले जाण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे