मुंबई – राज्यातील मंदिरांच्या कारभारात होत असलेल्या सरकारी हस्तक्षेप आणि विचाराधीन सनातन मंदिर बोर्डाच्या विरोधात 25 आणि 26 डिसेंबर रोजी राज्यभरातील मंदिरांच्या विश्वस्तांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील सुमारे 1 हजार मंदिरांचे प्रतिनिधी आणि विश्वस्त या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद, हिंदू जनजागृती समिती, श्री जिवदानी देवी मंदिर (विरार) आणि भिमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर (पुणे) यांच्यावतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आणि शिर्डीच्या साईबाबा मंदिराचे प्रतिनिधी उपस्थित राहणार नाहीत. या मंदिरांचे व्यवस्थापन राज्य सरकारच्या हाती आहे.
राज्यातील अनेक मंदिरांचे व्यवस्थापन आधीपासून राज्य सरकारच्या हाती असताना आता मुस्लिमांच्या वक्फ बोर्डाच्या धर्तीवर सनातन मंदिर बोर्ड तयार करण्याचा सरकारचा मानस आहे. सनातन मंदिर ट्रस्ट स्थापन झाल्यास राज्यातील बहुतांश मंदिरांचे व्यवस्थापन सरकारच्या ताब्यात जाईल, अशी भीती मंदिर व्यवस्थापनांना वाटते. त्यामुळे याविरोधात या सर्व मंदिरांच्या प्रतिनिधींकडून या बैठकीत सरकारच्या विरोधात एल्गार पुकारण्यात येणार आहे. काही मंदिरांच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यात गेल्या आहेत. तो मुद्दादेखील बैठकीत मांडला जाणार आहे.
यासंदर्भात बोलताना हिंदू जनजागरण समितीचे सुनीत घनवट यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात शिर्डी येथे होणार्या बैठकीच्या तयारीचा एक भाग म्हणून प्रतिनिधी मंडळाने नुकतीच शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगावले यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली भूमिका मांडली. गोगावले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, मंदिरांच्या व्यवस्थापनांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.