सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू थांबलेल्या हॉटेलला आग

हैदराबाद- हैदराबादमधील बंजारा हिल्स येथील पार्क हयात हॉटेलमध्ये आज सकाळी आग लागली. या हॉटेलमध्ये आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) संघाचे खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि व्यवस्थापनातील सदस्य थांबले होते. हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती तर एसआरएच संघ सहाव्या मजल्यावरील खोल्यांमध्ये वास्तव्यास होता. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व खेळाडूंना तातडीने दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर हॉटेल स्टाफने तातडीने घटनेची अग्नीशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले. विशेष म्हणजे, याच पार्क हयात हॉटेलमध्ये आज ओडेला-२ या आगामी तेलुगू चित्रपटाचा प्री-रिलीज सोहळा पार पडणार होता.