नवी दिल्ली- संसदेच्या १८ व्या हिवाळी अधिवेशनाचे काल शुक्रवारी सूप वाजले. हे अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून सुरू झाले होते. संपूर्ण अधिवेशन काळात एकूण २० बैठका झाल्या.तसेच लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात सुमारे १०५ तास कामकाज चालले. या अधिवेशनात लोकसभेमध्ये ५७.८७ टक्के तर राज्यसभेत ४१ टक्के कामकाज झाले.
या हिवाळी अधिवेशनात एकूण १६/१७ विधेयके सरकारने सूचीबद्ध केली होती.मात्र लोकसभेत केवळ ५ विधेयके मांडण्यात आली.त्यापैकी ४ संमत झाली आहेत.लोकसभेत १५ तास ४३ मिनिटे संविधानावर चर्चा झाली. यामध्ये ६२ सदस्यांनी सहभाग घेतला.राज्यसभेत १७ तासांहून अधिक चर्चा झाली ज्यामध्ये ८० खासदारांनी भाग घेतला.
‘एक देश, एक निवडणूक’ संबंधित १२९ वे संविधान (दुरुस्ती) विधेयक सर्वाधिक चर्चेत होते. हे विधेयक पुनरावलोकनासाठी ३९ सदस्यीय संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले आहे.लोकसभेतील २७ आणि राज्यसभेतील १२ खासदारांची समितीमध्ये निवड करण्यात आली आहे.या समितीला संसदेच्या पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी लोकसभेत अहवाल सादर करावा लागणार आहे.