लखनऊ- संभल इथे गेल्या दोन दिवसांत झालेल्या हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती आज संभलला आली. समितीच्या सदस्यांनी हिंसाचार झालेल्या ठिकाणांना भेटी देऊन संबंधितांची चौकशी केली. संभल मधील हिंसाचार ताजा असतानाच बदायू येथील जामा मशिदीच्या खालीही निळकंठ मंदिर असल्याच्या दाव्यावर न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे.
२४ नोव्हेंबर रोजी आयुक्तांच्या नेतृत्वाखाली संभल मशीदीचे सर्वेक्षण करायला स्थानिकांनी विरोध केला होता. पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधूराचा वापर केला. संभल मस्जीद प्रकरणी उसळलेल्या हिंसाचारात ५ जणांचा मृत्यू झाला होता तर १९ जण जखमी झाले होते. त्यानंतरही या भागात तणाव कायम होता. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर या हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. काल या सदस्यांनी मुरादाबाद येथील विश्रामगृहावरही काही जणांशी चर्चा केली. आज त्यांनी जामा मस्जिद व आजुबाजूच्या परिसराची पाहणी केली. या प्रकरणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी संसदेतही आवाज उठवला होता.
संभलच्या मस्जिदीनंतर बदायूं च्या जामा मशीदीच्या जागी निळकंठ महादेव मंदिर असल्याच्या प्रकरणीही सुनावणी सुरु असून त्यावर मुस्लिम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी जोरदार टीका केली आहे. आपल्या पोस्टद्वारे सरकारवर टीका करत त्यांनी म्हटले आहे की, सध्याच्या काळात तरुणांपुढे कृत्रिम बुद्धीमत्तेच्या माध्यमातून विकास घडवण्याचे आव्हान असतांना त्यांना प्राचीन वस्तू खणून काढण्यात गुंतवले जात आहे.