संजय राऊत-चंद्रहार पाटील मुंबईला परतले सांगली मतदारसंघात पुन्हा खळबळ सुरू

मुंबई – सांगली मतदारसंघ हा परंपरेने काँग्रेसचाच असल्याने तो काँग्रेसलाच मिळावा यासाठी आमदार विश्‍वजित कदम आणि संभाव्य उमेदवार विकास पाटील हे जोरदार प्रयत्न करीत असतानाच आज सांगलीचे उबाठाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना घेऊन संजय राऊत मुंबईला परतल्याने हा मतदारसंघ कुणाला मिळणार याची चर्चा पुन्हा तापली.
मात्र ‘नवाकाळ’शी बोलताना संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, सांगलीची जागा उबाठाच लढणार आहे. विश्‍वजित कदम आणि विकास पाटील हे काँग्रेसचे सच्चे नेते आहेत. ते बंडखोरी करणार नाहीत. येत्या काही दिवसांत ते उबाठा उमेदवाराचा प्रचार करताना दिसतील. माझा सांगली दौरा संपल्याने मी मुंबईला परतलो. माझ्यासोबत चंद्रहार पाटील आले. कारण मुंबईतील कोल्हापूर व सांगली रहिवाशांचा आज मेळावा होता. त्या मेळाव्याला ते उपस्थित राहत आहेत.
सांगलीत काँग्रेस व उबाठा गट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होईल, अशी जोरदार चर्चा आहे. संजय राऊत यांनी ही शक्यता फेटाळून लावली असली तरी काँग्रेसने अजून दावा करण्याचे सोडले नसल्याने चर्चा संपलेली नाही. आज भाजपा नेते नितेश राणे कणकवलीत म्हणाले की, मैत्रीपूर्ण लढतीचा काँग्रेसचा सल्ला ऐकून उद्धव ठाकरे आणि राऊत घाबरले आहेत. सांगलीत लढत झाली तर उबाठाच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल.
दरम्यान, महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने भिवंडी आणि सांगली लोकसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीचा विचार काँग्रेसने पुढे आणला आहे. मैत्रीपूर्ण लढती हाच अखेरचा मार्ग असल्याचे मत मांडून भिवंडी, सांगलीसाठी तसा प्रस्ताव काँग्रेसने पक्षश्रेष्ठींनादेखील पाठवला आहे. शिवसेना ठाकरे गटाने याला कडाडून विरोध केला आहे. मैत्रीपूर्ण लढती झाल्यास महायुतीचा पराभव करण्यासाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीसाठी हा सर्वात मोठा धक्का असणार आहे.
सांगली आणि भिवंडीच्या उमेदवारीचा घोळ संपत नसल्याने या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत व्हाव्यात, असे वक्तव्य भिवंडी मतदारसंघाचे पक्ष प्रभारी व वरिष्ठ काँग्रेस नेते अनिस अहमद यांनी केले आहे. अहमद म्हणाले की, भिवंडी आणि सांगलीमध्ये फ्रेंडली फाईट म्हणजेच मैत्रीपूर्ण लढत घेणे हा आमच्याकडे अखेरचा मार्ग आहे. भिवंडी मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार राहिलाच पाहिजे व त्यासाठी मैत्रीपूर्ण लढत करावी, असा प्रस्ताव आम्ही पक्षश्रेष्ठींना दिला आहे. भिवंडीत काँग्रेस पक्ष जास्त मजबूत आहे. कोकणात आम्ही सर्व जागा शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला दिल्या आहेत. त्यामुळे भिवंडीची जागा काँग्रेससाठी सोडावी, असा आमचा आग्रह आहे. मात्र, तसे न झाल्यास भिवंडीत मैत्रीपूर्ण लढत होईल.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र मैत्रीपूर्ण लढतींना कडाडून विरोध केला. ते म्हणाले की, याबाबत बोलणारे अनिस अहमद कोण? मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेण्याइतके अनिस अहमद मोठे नेते नाहीत. फ्रेंडली फाईट हा घातक शब्द आहे. मग सगळीकडे फ्रेंडली फाईट होईल. ही गोष्ट नाना पाटोले बोलत असतील तर चांगली गोष्ट आहे. फ्रेंडली फाईटचे अधिकार वरिष्ठ पातळीवरून होतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top