शेअर बाजारातील फसवणूक! अदानी बंधू निर्दोष! कोर्टाचा निर्णय

मुंबई- मुंबई शेअर बाजारात घोटाळा करून बाजाराचे 388 कोटी रुपयांचे नुकसान केल्याच्या प्रकरणातून मुंबई उच्च न्यायालयाने गौतम अदानी व त्यांचे बंधू राजेश अदानी यांना दिलासा दिला आहे. एसएफआयओ म्हणजेच गंभीर गुन्हे तपासणी कार्यालयाने 2012 साली अदानी एंटरप्रायजेस विरोधात बाजार नियमांचे उल्लंघन प्रकरणी खटला दाखल केला होता.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश लढ्ढा यांनी मुंबईच्या सत्र न्यायालयाने या प्रकरणात 2019 मध्ये दिलेला आदेशही रद्द केला. या आदेशात अदानी यांना आरोपमुक्त करण्याला नकार दिला होता. सत्र न्यायालयाच्या या आदेशाविरोधात अदानींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा आदेश रद्दबातल ठरवत अदानी यांना या प्रकरणातून आरोपमुक्त केले आहे. अदानी व त्यांचे बंधू राजेश अदानी यांनी कटकारस्थान करत बाजाराचे 388 कोटींचे नुकसान केले असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने अदानींना आरोपमुक्त करण्यास नकार दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाने आज अदानी बंधुंना या आरोपामधून मुक्त केले आहे.