नागपूर – विधानसभेत शिवजन्मभूमीला मंत्रिमंडळात घ्या, नाहीतर मतदारसंघात परतणे कठीण होईल, अशी मागणी जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आमदार सोनवणे म्हणाले की, मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे. जुन्नर हा छत्रपती शिवरायांचा जन्म झाला तो मतदारसंघ आहे. मी पहिल्याच दिवशी महायुती शासनाला पाठिंबा जाहीर केला. छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मभूमीला मंत्रिमंडळात घ्या हे म्हणायलासुद्धा मला स्वतःला कमीपणा वाटतो.मी स्वतःसाठी मंत्रिमंडळ स्थान मागतो का? मंत्रिमंडळात समावेश मागतो का? पण असे नाही. शिवभूमीचा आदर झाला पाहिजे.मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे, की मी सादर केलेल्या निवेदनावर गांभीर्यपूर्वक विचार व्हावा. शासनाने शिवनेरी किल्ल्यासाठी जे काम केले आहे ते संपूर्ण शिवनेरीला आणि जुन्नरकरांना माहीत आहे.या कामाला पूर्णत्वाकडे न्यायचे तर स्वरूप द्यायचे असेल तर आपण मंत्रिमंडळात हक्काचे स्थान द्यावे , हा हक्क मागायला मी सभागृहात उभा आहे. नाही तर मला मतदारसंघात परत जाणे कठीण होईल.