मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचे गड आणि किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करावेत, असा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने युनेस्कोकडे पाठविला आहे. त्यामुळे हे किल्ले आंतरराष्ट्रीय पातळींवर झळकणार आहेत. छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नक्की समाविष्ट होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्यावतीने आयोजित बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी शिंदे म्हणाले की, शिवकालीन वारसा जागतिक स्तरावर नेण्यासाठी राज्य सरकार निश्चितपणे सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.याबाबत अधिक मार्गदर्शनासाठी जागतिक वारसा समितीच्या ४६ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष आणि युनेस्कोमधील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांना निमंत्रित करण्यात आले होते.
दरम्यान,युनेस्कोतर्फे २०२४ -२०३५ साठी वारसा स्थळांची नवी यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामध्ये स्वराज्य निर्मितीत मोलाची भर टाकणार्या आणि मराठा लष्कराची ऊर्जास्थाने असलेल्या गड आणि किल्ल्यांचा समावेश करावा, अशी शिफारस करण्यात आली आहे.एकूण १२ किल्ल्यांचा समावेश करावा, अशी मागणी केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड , राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा,विजय दुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी यांचा समावेश आहे. हे २७ आणि १९ व्या शतकातील किल्ले आहेत