शिक्षक निवडणुकीत पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरलही ने हमीचीच प्रक्रिया! मंत्र्याचे धक्कादायक वक्तव्य

मुंबई – नाशिक शिक्षक मतदारसंघाची 26 जून रोजी होणारी निवडणूक सध्या अनेक घडामोडींमुळे गाजत आहे. आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत या मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर मुख्याध्यापक आणि शिक्षकांना 500 रुपयांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप केला. त्यावर प्रतिक्रिया देताना पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी अत्यंत धक्कादायक वक्तव्य केले. खर्चाला पैसे देणे, हा निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे, असे ते म्हणाले. राज्याच्या मंत्र्यांनीच असे विधान केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. निवडणुकीत पैसा वाटप होतो याची त्यांनी कसलीही तमा न बाळगता कबुलीच दिली.
नाशिक शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे काल सभा झाली. या सभेला जळगाव-धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थेतील संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. या सभेनंतर उपस्थितांना 500 च्या नोटा वाटत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून सुषमा अंधारे म्हणाल्या की, हा व्हिडिओ फेक नाही. मला तो नाशिक शिक्षक मतदारसंघातील एका उमेदवारानेच पाठवला आहे. त्यानेच तो शूट केला आहे. सभा संपल्यावर त्याच मंडपात हे पैसे वाटप सुरू होते. यात एका कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी पैसे घेताना स्पष्ट दिसत आहेत. तेच आधी झालेल्या कार्यक्रमातही बसलेले दिसतात. त्यांना पैसे देणारा शिंदे गटाचा आहे. त्याआधी या सभेत गुलाबराव पाटील म्हणाले होते की, दराडे यांच्या मतांसाठी आम्ही दरोडा घालायला तयार आहोत. किशोर दराडेंचा लौकिकही काही चांगला नाही. गेल्या निवडणुकीत त्यांच्यावर पैठणी वाटल्याचा आरोप झाला होता. सरकारला आणखी कसला पुरावा हवा? माझ्याकडे आणखी व्हिडिओ आहेत. हा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर झाला असल्याने त्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवे. नाहीतर आम्ही कायदेशीर तक्रार करू. निवडणूक आयोग कुठे आहे?
सुषमा अंधारे यांनी टाकलेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेनंतर आम्ही घरी निघून गेलो. पुढे काय झाले ते ठाऊक नाही. पोलिंग एजंट याद्या देताना सोबत पैसे देतात. खर्चाला असे पैसे देणे, हा निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे.
त्यांच्या या धक्कादायक वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आमदार कपिल पाटील म्हणाले की, शिक्षक हा स्वाभिमानी आहे. त्यांची किंमत कुणी लावू नये. त्यांनी एका बँकेचे सभासद आणि आदर्श घोटाळ्यात नाव असलेले उमेदवार दिले. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी त्यांचा पराभव होणार आहे. खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका करत म्हटले की, तुम्ही या थरापर्यंत खाली येऊ नका. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टरमधून 20 कोटी कसे उतरवले हे सगळ्यांनी पाहिले. पैशांच्या बॅगा तुमचे अंगरक्षक पेलवत होते. पण कृपा करून पदवीधर, शिक्षक या वर्गाला बाजारात ओढू नका. निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी हा व्यभिचार पाहत आहे. लोकशाहीची हत्या होत आहे. लोकशाहीचे वस्त्रहरण रोखण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे, पण आयोग धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्याला पट्टी लावून पाहत बसला आहे. या पट्टीची गाठ मोदी आणि शहा यांनी बांधली आहे.
या व्हिडिओवरून गदारोळ झाल्यानंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया देताना ठाकरे गटालाच सुनावले. ते म्हणाले की, पराभवाची चाहूल लागल्याने ठाकरे गटाच्या नेत्यांनी कारणे शोधायला सुरुवात केली आहे. त्या व्हिडिओशी शिवसेनेचा संबंध नाही. तो पक्षाचा कार्यक्रम नव्हता. अंधारे यांनी तो व्हिडिओ निवडणूक आयोगाकडे पाठवावा. ते सत्यता पडताळून पाहतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top