शहापूरच्या हिरव्यागार भेंडीला युरोपसह आखाती देशांत मागणी

शहापूर – तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनी भातसा जलाशयाच्या कालव्याचे पाणी आणि कानवी नदी ओव्हळाच्या पाण्यावर भाजीपाल्याची लागवड केली आहे.यात भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणावर असून व्यापाऱ्यांकडून ही भेंडी ३५ ते ४० रुपये दराने खरेदी केली जात आहे. ग्रामीण भागातील या भेंडीला आता परदेशातूनही मागणी होत आहे.अगदी युरोप,ब्रिटन आणि आखाती देशांमध्येही ही शहापूरची हिरवीगार भेंडी रवाना होत आहे.

यावर्षी शहापूरात भेंडीचे विक्रमी उत्पन्न झाले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात भेंडीची आवक कृषी उत्पन्न बाजार समितीतीत वाढली आहे.शेतकर्‍याच्या मळ्यातून निघणारी ही भेंडी खरेदीसाठी वाशी, दादर अशा भाजी मंडईतील मोठे व्यापारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज दाखल होत आहेत. येथेच भेंडी उत्पादक शेतकरी भेंडी विक्रीसाठी आणतात व्यापार्‍यांकडून ही भेंडी जागेवरच ३५ ते ४० रुपये किलोच्या भावाने शेतकर्‍यांकडून खरेदी केली जात आहे. पुढे हीच भेंडी शहरातून व्यापार्‍यांकडून दुप्पट भावाने खरेदी करुन परदेशात सातासमुद्रापार निर्यात होते.भेंडीला युरोप ब्रिटन आणि आखातातील अरब देशांमधून मागणी वाढत असल्याचे या व्यवसायातील व्यापारी सांगतात.

तालुक्यातील साजीवली, सरलांबे,खरीवली, कवडास, तुते,आवरे,कांबारे,सापगाव, खुटघर अंदाड,हिव आदी परिसरासह भातसई, शेई, शेरा अंबर्जे,मढ,नेहरोली नडगाव,शिरगाव, लेनाड शेंद्रुण तसेच किन्हवली परिसरात मळेगाव, बेडीसगाव,परटोली,मुगाव, कानवे,चेरवली,चरीव,आपटे,खरांगण,गेगाव,नांदवळ,
आस्नोली मुगाव, शेलवली, शिळ,आदी गावागावातील शेतकरी दरवर्षी हिवाळा आणि उन्हाळ्याच्या मोसमात भाजीपाला लागवड करतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top