पुणे – भाजपाचे ज्येष्ठ नेते गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुण्यात येऊन कार्यकर्त्यांसमोर जोशपूर्ण भाषण करत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. महाराष्ट्रात 2014, 2019 नंतर आता 2024 ला प्रचंड यश मिळवत भाजपाच्या नेतृत्वाखाली सरकार आणायचे आहे, असे आवाहन केले. जो विजयी होतो तोच सत्तेवर येतो आणि केंद्रात आपण सत्तेवर आहोत. त्यामुळे भाजपाला कमी यश मिळाले हा जो भ्रम विरोधक पसरवत आहेत त्याला बळी पडू नका. महाराष्ट्रात भाजपाला प्रचंड यशस्वी करून राहुल गांधींचा अहंकार नष्ट करा, असे सांगताना शरद पवार हे भ्रष्टाचार्यांचे सरदार आहेत आणि उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅनक्लबचे प्रमुख आहेत, अशी कडाडून टीका शहा यांनी केली.
पुण्याच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अमित शहा म्हणाले की, महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याने परिश्रमाची पराकाष्ठा करून आपल्या नेत्याला तीन वेळा पंतप्रधान केले. आताही महाराष्ट्रात 2014, 2019 नंतर 2024 मध्ये मोठे यश मिळवायचे आहे. मला कालपासून अनेक भेटले. त्यांच्यात संभ्रम दिसला. विरोधी पक्षाने भ्रम पसरवला आहे. आपल्या यशाबद्दल शंका निर्माण केली आहे. पण लक्षात ठेवा की, जो विजयी असतो तोच सत्तेवर बसतो. सत्तेवर आपण बसलो आहे. मात्र पराभूत झालेल्या नेत्याला अहंकार चढला आहे. भाजपाला 240 सीट मिळाल्या आणि पूर्ण इंडिया आघाडीला मिळूनही 240 सीट मिळाल्या नाहीत. देशातील जनतेने मोदींच्या कार्याला पाठिंबा दिला आहे. एनडीएला 300 सीट दिल्या. परंतु आपल्या कार्यकर्त्याला अधिक मोठा विजय अपेक्षित होता. त्यामुळे ते काहीसे खट्टू झाले आहेत. अशा वेळी निराश होऊन बसायचे नाही. 2024 साली महाराष्ट्रात मोठे यश मिळवून उट्टे काढायचे आहे. हताश होऊ नका. अॅण्टी इन्कंबसी असूनही आपण विजयी झालो. राजीव गांधी आपली चेष्टा करायचे की हम दो, हमारे दो. आता तीच काँग्रेस गेली दहा वर्षे विरोधी पक्षात बसली आहे. महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार सत्तेवर येईल, ही काळ्या दगडावरील रेष आहे. मोदींनी 370 कलम हटवले, राममंदिर बांधले, उत्तराखंडात समान नागरी कायदा आणला असून संपूर्ण देश आता हा कायदा येण्याची वाट पाहत आहे. मोदींनी काशी विश्वनाथाचे भव्य मंदिर बांधले. या सगळ्याची कुणीच कल्पना केली नव्हती.
अनेकजण आपली दिशाभूल करीत आहेत. मी सांगतो की, भाजपा देशावर 30 वर्षे राज्य करणार आहे, आपला आत्मविश्वास जागृत करायचा आहे. देवेंद्र फडणवीस आता लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना राबवत आहेत. केवळ भाजपाच गरिबांसाठी काम करतो. काँग्रेस सांगते की, तेच गरीब, आदिवासींसाठी काम करतात. पण त्यांनी काय केले? आपण दहा वर्षांत गरिबांसाठी अनेक योजना केल्या. त्यांनी घटना बदलणार असा भ्रम निर्माण केला.
पवारांना सांगतो की, जेव्हा जेव्हा राज्यात भाजपाचे सरकार येते, तेव्हा तेव्हा मराठा आरक्षण मिळते. जेव्हा पवारांचे सरकार येते तेव्हा मराठा आरक्षण जाते. फडणवीसांनी मराठा आरक्षण दिले. त्यानंतर पवारांचे सरकार आले तेव्हा आरक्षण गेले. आता पुन्हा आपले सरकार आल्यावर आपण आरक्षण दिले. जर मराठा आरक्षण टिकायचे असेल तर महायुतीचे सरकार सत्तेवर आले पाहिजे. दूधभुकटी आयात केल्याचा भ्रम त्यांनी पसरवला. आम्ही दूधभुकटी आयात केली नाही आणि करणार नाही. भारतात भ्रष्टाचाराचा सम्राट कुणी असेल तर शरद पवार आहेत. आमच्यावर कसले आरोप करता? तुम्ही भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप दिले. यावेळी आमचे कार्यकर्ते तुमचे खोटे बोलणे उघड करतील. शरद पवार तुमची राज्यात दहा वर्षे सत्ता होती तेव्हा तुम्ही काही दिले नाही. युपीए सरकारने आपल्या 10 वर्षांच्या काळात 1 लाक 91 हजार कोटी दिले. तर मोदींनी 10 लाख 5 हजार कोटी दिले. हा हिशेब मान्य नसेल तर चौक ठरवा आमचे खासदार मोहोळ येऊन तुम्हाला हिशेब सांगतील. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड जिंकलो की राहुल गांधींचा अहंकार नष्ट होईल. महाराष्ट्रात आजवरचा सर्वात मोठा विजय मिळाला तर देशभरातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल. पुन्हा एकदा महाराष्ट्रात भाजपा सरकार
आणायचे आहे.
महाराष्ट्राचे साखर कारखाने महत्त्वाचे आहेत. 10 हजार कोटींच्या कराचा प्रश्न शरद पवार सोडवू शकले नाहीत. मी हा प्रश्न दोन मिनिटांत सोडवला. राहुल गांधींचे खटाखट खटाखट आठवते ना? केंद्रात तुमचे सरकार आले नाही, पण तेलंगणा आणि इतर राज्यात तुमचे सरकार आहे. तिथे पैसे द्या.
उद्धव ठाकरेंचा ‘औरंगजेब फॅनक्लब’
आघाडीचे नेते ‘औरंगजेब फॅनक्लब’चे सदस्य आहेत. संभाजीनगरला विरोध करणारे, पीएफआयला पाठिंबा देणारे यांच्यासोबत उद्धव ठाकरे बसले आहेत. औरंगजेब फॅनक्लबचे ते प्रमुख आहेत. ते देशाला सुरक्षित ठेवू शकत नाहीत.