मुंबई – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचा काल 85 वा वाढदिवस दिल्लीत साजरा झाला. या निमित्ताने राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी पहिल्यांदाच काका शरद पवार यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येणार, अशी चर्चा सुरू झाली. त्यातच आज पवार कुटुंबातील आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी जाहीरपणे म्हटले की, मूठ एकत्र ठेवली तर ताकद राहते. त्यामुळे शरद आणि अजित पवार गटाने एकत्र यावे. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची हीच इच्छा आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे मानले पाहिजे.
सुनंदा पवार या शरद पवार यांच्या स्नुषा लागतात. आज पुणे जिल्ह्यातील भिमथडी येथे पत्रकारांशी बोलताना सुनंदा पवार म्हणाल्या की, कालची शरद पवार व अजित पवार यांची भेट कौटुंबिक होती. शरद पवार यांनी 85 व्या वर्षात पदार्पण केले त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण आले होते. दरवर्षी आम्ही सर्व कुटुंबीय शरद पवारांना वाढदिवसानिमित्त भेटत असतो. त्यात काही राजकीय आहे, असे मला वाटत नाही. अजितदादा काही बोलले, कुणाला भेटले, कुठे गेले की त्याची बातमी होते. पण मला त्या भेटीत बातमीसारखे काही वाटत नाही. कुटुंबामध्ये मतभेद असतात. सर्वच कुटुंबामध्ये ते असतात. पण मतभेद बाजूला सारून कुटुंब एकत्र येईल. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. राजकारण करताना कार्यकर्ते महत्त्वाचे असतात. त्यांच्या भावना जाणून घेणे ही राज्यकर्त्याची जबाबदारी असते. कार्यकर्त्यांची भावना आहे की दोघांनी एकत्र यावे. विखुरलेले राहिलो तर ताकद कमी होते. मूठ घट्ट असली की ताकद राहते. त्यामुळे एका मुठीत पक्ष राहिला तर महाराष्ट्रात पक्षाची ताकद चांगली राहील. कार्यकर्त्यांच्या भावनांचा मी आदर करते. कार्यकर्त्यांनी या भावना व्यक्त केल्या असल्या तरी अजित पवार आणि शरद पवार यांनी काय करायचे, हा त्यांचा निर्णय आहे. ते याबाबत विचार करून निर्णय घेतील याबद्दल शंका नाही. या विषयावर शरद पवार, अजित दादा किंवा रोहितसोबत मी वैयक्तिक चर्चा केली नाही. पवार कुटुंब सामाजिक, राजकीय, व्यवसाय या विविध क्षेत्रात स्वतंत्र काम करते. परंतु अखेर कुटुंब हे कुटुंब असते. कुटुंबाची ताकद पुन्हा एकत्र यावी, असे महाराष्ट्राला वाटते. मलादेखील वाटते. शरद पवार हे 60 वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यांना राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाते. एकत्र येण्यासंदर्भातील निर्णय सर्वस्वी शरद पवार व अजित पवार या दोघांचा आहे. त्यांनी काय करावे किंवा काय करू नये, हे मी सांगू शकत नाही.
सुनंदा पवार यांच्या वक्तव्यावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, सुनंदा पवार यांची प्रतिक्रिया स्वागतार्ह आहे. पण त्यासाठी थोडा उशीरच झाला आहे. षण्मुखानंद येथे झालेल्या मेळाव्यात अजित पवार यांनी हीच भूमिका काही काळापूर्वी मांडली होती. आता या प्रतिक्रिया येणे स्वाभाविकच आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात 41 आमदार निवडून आले आहेत. एक लोकसभा तर दोन राज्यसभेचे खासदार आहेत. अशावेळेस ‘देर आये पर दुरूस्त आये’ असे म्हणून त्यांना एकत्र यायचे असेल तर त्यांनी अजित पवार यांचे नेतृत्व मान्य करून एकत्र यावे.