शरद पवार गट, उबाठा गटाला धक्का राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा (उबाठा) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करून निवडणूक आयोगाने राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा देऊन मोठा धक्का दिला आहे. त्याचबरोबर नुकताच स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाला आता राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा देण्याचा निर्णय आयोगाने घेतला. तर आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे.
कोणत्याही राजकीय पक्षाला राज्य आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देताना लोकप्रतिनिधींना मिळालेल्या मतांची संख्या लक्षात घेतली जाते. प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देण्यासाठी 1968 च्या निवडणूक आयोग पक्ष चिन्ह आणि पक्षाच्या नियमानुसार निकष ग्राह्य धरला जातो. लोकसभा निवडणुकीत पक्षांना मिळालेल्या मतांची आकडेवारी लक्षात घेऊन आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्याच्या अगोदर राष्ट्रीय पक्ष होता. फुटीनंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवारांना मिळाले. मात्र त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला नाही, पण फुटल्यावरही मत संख्या व इतर निकषांवर निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यस्तरीय दर्जा दिला आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणासह इतर राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीत मिळालेली आकडेवारी लक्षात घेऊन आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तिन्ही पक्षांना राज्य पक्षांचा दर्जा मिळाल्यानंतर, त्यांच्या चिन्हांचाही राज्य चिन्हांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. यामुळे मशाल, तुतारी वाजवणारा माणूस आणि घड्याळ आता राज्यस्तरीय चिन्ह असतील. ‘आप’चे झाडू चिन्ह राष्ट्रीय चिन्ह असेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top