वॉशिंग मशीन पुन्हा एकदा फिरले यावेळी अजित पवार! बँक घोटाळा बंद

मुंबई – लोकसभा निवडणुका जवळ येताच भाजपाचे वॉशिंग मशीन वेगाने फिरू लागले आहे. याआधी जे नेते भाजपाच्या दृष्टीने भ्रष्टाचारी, कलंकित होते ते आपल्या आश्रयाला आल्यानंतर भाजपा त्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून बेदाग करीत आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांना भाजपाने वॉशिंग मशीनमध्ये टाकून निष्कलंक करण्याचे काम सुरू केले. आता राष्ट्रवादी पक्ष फोडून कमळाशी सलगी केलेल्या अजित पवार यांचा नंबर लागला आहे. अनेक वर्षे चर्चेत असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्यात अजित पवार हे एक आरोपी आहेत. मात्र ते आता भाजपाच्या छावणीत असल्याने या घोटाळ्याचा तपासच गुंडाळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तपास बंद करण्याची परवानगी देण्याची विनंती मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने विशेष न्यायालयाकडे केली आहे.
आता भाजपाचे वॉशिंग मशीन अजित पवार यांच्यासाठी पुन्हा सुरू झाले आहे. यापूर्वी जेव्हा अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ‘पहाटेचा शपथविधी’ केला होता, तेव्हा 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याची फाईल भाजपाने बंद केली होती. पण त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अजित पवार पळून पुन्हा शरद पवार यांच्या गोटात दाखल झाले होते. त्यामुळे शिखर बँक घोटाळ्याचा ससेमिरा तसाच राहिला. पंचवीस हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्यात एक आरोपी आहेत. या घोटाळ्यावरून भाजपाचे नेते अजित पवार यांना तुरुंगात टाकण्याच्या वल्गना करीत होते. ऑक्टोबर 2022 मध्ये भाजपाच्या सुचनेवरूनच आर्थिक गुन्हे शाखेने शिखर बँक घोटाळ्याचा तपास आपल्या हाती घेतला. त्यामुळे अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या. चौकशीचा फास आवळला जाईल, असे स्पष्ट दिसू लागताच अजित पवार यांनी पुन्हा एकदा काका शरद पवार यांच्याशी बंडखोरी करून कमळाचा देठ हातात धरला. त्यानंतर बाजू पुन्हा पलटली. शिखर बँक घोटाळ्यातून अजित पवार यांना निष्कलंक करण्याचे काम भाजपाने सुरू केले.

विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी काल विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या न्यायासनासमोर सी समरी रिपोर्ट दाखल केला. चुकीच्या माहितीच्या आधारे एखादा गुन्हा दाखल केला जातो तेव्हा आरोपामध्ये तथ्य नसल्याने पोलीस तपास थांबविण्याची परवानगी मागताना न्यायालयात सी समरी रिपोर्ट दाखल करतात.
शिखर बँक घोटाळ्यात पोलिसांनी सी समरी रिपोर्ट पोलिसांनी दाखल केला म्हणजे अजित पवार यांना भाजपाने दिलेली बक्षीसी आहे. भाजपाच्या पावन स्पर्शाने एकेकाळी 70 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा आणि 25 हजार कोटींचा शिखर बँक घोटाळा असे दोन दोन महाघोटाळे नावावर असलेले अजित पवार कलंकमुक्तीच्या दिशेने चालले आहेत. विशेष न्यायालयाने पोलिसांचा सी समरी रिपोर्ट स्वीकारला की अजित पवार यांना आपोआप क्लिन चीट मिळणार आहे.
फडणवीस उत्तर द्या –
खा. संजय राऊत
या घडामोडीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर पुन्हा एकदा निशाणा साधला. अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा आणि 25 हजार कोटी रुपयांच्या शिखर बँक घोटाळ्याचा आरोप करणारे देवेंद्र फडणवीस सध्या गृहमंत्री आहेत. त्यांच्या मांडीला मांडी लावून अजित पवार बसले आहेत.
शिखर बँक तपास बंद करण्याची उपरती पोलिसांना आत्ताच का झाली याचे उत्तर फडणवीस यांनी दिले पाहिजे. त्यांनी उत्तर दिले नाही तर जे. पी. नड्डा यांना विचारले पाहिजे. त्यांनाही उत्तर देता आले नाही तर देशाचे गृहमंत्री असलेल्या अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिले पाहिजे, असे राऊत म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top