जम्मू – हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणार्या भाविकांसाठी रोपवे उभारण्याच्या निर्णयाला स्थानिक दुकानदार, कामगार व पिट्टुवाले, पालखीवाले, घोडेवाले या व्यावसायिकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे . त्यांनी याविरोधात आंदोलनही केले आहे. यातील बहुसंख्य मुस्लीम असल्याने विरोध करीत असल्याची चर्चा आता सुरू झाली असून, त्यांच्या विरोधाला धार्मिक रंग दिला जात आहे.
वैष्णोदेवीच्या दर्शनाचा मार्ग हा खडतर आहे. या मंदिरात जाण्यासाठी किमान सहा तासांचा पायी किंवा घोड्यावरून वा पालखीतून प्रवास करावा लागतो. म्हणूनच श्री वैष्णोदेवी मंडळाने सुमारे 250 कोटी रुपये खर्च करून ताराकोटे मार्ग ते सानजी छाट या 12 किलोमीटर अंतरावर रोपवे उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र या रोपवेला येथील दुकानदार, कामगार, घोडे व पालखीवाले यांनी जोरदार विरोध केला आहे. हा रोपवे झाल्यास आम्ही सर्व बेरोजगार होऊ अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. या विरोधात त्यांनी शालीमार पार्क व उपविभागीय न्यायदंडाधिकार्यांच्या
कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. गेल्या तीन दिवसांपासून हे सर्वजण संपावर गेले असून, घोडेवाले व पालखीवाल्यांनी आपली सेवा बंद केल्यामुळे भाविकांचे प्रचंड हाल झाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जम्मू-काश्मीर प्रमुख मनीष साहनी यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यामुळे भाविकांना सेवा देणार्या कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेते व कामगार संघटनेचे अध्यक्ष भूपिंदर सिंग जमावाल यांनी रोप वे मुळे बेरोजगार होणार्या प्रत्येक कामगाराच्या पुनर्वसनाची मागणी करत प्रत्येकाला 20 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.