लखनऊ- उत्तर प्रदेशातील वीज विभागाच्या खाजगीकरणाविरोधात देशव्यापी आंदोलन करण्याची हाक देण्यात आली आहे. येत्या १३ ते २२ डिसेंबर या कालावधीत देशभरात सभा होणार आहेत. वीज विभागातील कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय संघटनेने हे आवाहन केले आहे.
वीजेच्या खाजगीकरणाविरोधात २२ डिसेंबरला लखनऊ तर २५ डिसेंबरला चंदीगढमध्ये सभा होणार आहेत. उत्तर प्रदेशातील पूर्वांचल व दक्षिणांचल विद्युत वितरण विभागांचे खाजगीकरण करण्याच्या आदेशामुळे कर्मचारी नाराज आहेत. आज लखनऊत इलेक्ट्रिसीटी कामगार संघटनेच्या राष्ट्रीय समन्वय समितीच्या बैठकीत या प्रश्नावर देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला. त्यानुसार १३ ते २२ डिसेंबर या काळात हे आंदोलन करण्यात येणार आहे. देशातील २७ लाख वीज कर्मचारी यावेळी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहेत. चंदीगढमध्येही वीज विभागाचे खाजगीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन ठिकाणांसह देशातील विविध भागात हे आंदोलन करण्यात येणार आहे.