विधानसभा ’खोक्या’नी भरलेली! राज ठाकरेंचे पक्षसंघटनेत बदल


मुंबई- मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पक्षसंघटनेत बदल करत अनेक नवीन पदे आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. मुंबई शहराध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची निवड केली, तर अमित ठाकरेंवर सर्व शाखाध्यक्षांच्या कामाचा आढावा घेण्याची जबाबदारी सोपवली. या बैठकीत भाषण करताना राज ठाकरेंनी सरकारलाही टोला लगावला. ते म्हणाले की, राज्यात एक खोक्या भाई काय घेऊन बसलात. अख्खी विधानसभा खोक्याभार्इंनी भरली आहे.
रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या या बैठकीनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले की, मुंबईत काही पदांची नव्याने रचना करण्यात आली आहे. आतापर्यंत पक्षात विभागाध्यक्षपद होते. आता मुंबईत पहिल्यांदाच शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष नेमण्यात आले आहेत. यामध्ये एक शहर अध्यक्ष, तीन उपशहराध्यक्ष अशी रचना करण्यात आली आहे. शहराध्यक्षपदावर संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, कुलाबा ते माहीम-शीवपर्यंत विभागाचे यशवंत किल्लेदार, पश्चिम उपनगराचे कुणाल माईनकर आणि पूर्व उपनगराचे योगेश सावंत हे उपशहराध्यक्ष असतील. त्यांनी कोणत्या गोष्टी करायच्या, कसे काम करायचे हे त्यांना 2 एप्रिलला लेखी स्वरूपात सांगण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय समिती तयार करण्यात आली असून, ती या प्रत्येक घटकाकडे बारकाईने लक्ष ठेवून संवाद साधण्याचे काम करेल. या समितीची जबाबदारी बाळ नांदगावकर यांच्याकडे असेल. नितीन सरदेसाई विभागाध्यक्ष आणि अमित ठाकरे शाखाध्यक्षांची जबाबदारी सांभाळतील. केंद्रीय समितीला नियुक्तीचे अधिकार आहेत. ते मला सांगून नियुक्त्या करतील. एखाद्याची का नियुक्ती केली किंवा त्याला पदावरून का काढले, याबाबत मला माहिती देतील. मुंबईप्रमाणेच ठाण्यासाठीही एक केंद्रीय समिती तयार केली आहे. त्यामध्ये अविनाश जाधव, राजू पाटील, अभिजित पानसे, गजानन काळे यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्त्यांमुळे दोन्ही बाजूंनी पक्ष बांधला जाईल. सध्या मुंबई आणि ठाण्यात केलेल्या या बदलाप्रमाणेच बदल संपूर्ण महाराष्ट्रातही एप्रिल-मे महिन्यात करण्यात येणार आहे.
मनसेच्या मुंबई शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर संदीप देशपांडे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, शहराध्यक्षपद ही महत्वाची जबाबदारी आहे. राज ठाकरे यांनी मोठा विश्वास दाखवला आहे. आमचे सर्वात पहिले काम मिशन मुंबई असणार आहे. मुंबई महापालिका जोरात आणि जोमात लढवून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू. पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकांचा विचार हा राज ठाकरे यांनी केला असेल. यावेळी मुंबई महापालिकेत निश्चित बदल होईल. आजपासून मनसेचे मिशन महापालिका सुरू होणार आहे.
या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकार्यांसमोर भाषणही केले. त्यावेळी त्यांनी आ. सुरेश धस यांचा गुन्हा दाखल झालेला कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, अख्खी विधानसभा खोक्याभार्इंनी भरली आहे. सगळे खोके आत भरलेत. मूळ विषय बाजूला ठेवून इतर गोष्टींनी तुम्हाला भरकटवले जात आहे. हा टोला त्यांनी नेमका कुणाला लगावला, याची चर्चा होत आहे.