विद्यार्थ्याला सांगितले! जानवे काढ! सीईटी परीक्षा देताना मागणी! नवा वाद

बंगळुरु- कर्नाटकातील एका महाविद्यालयात सीईटी परीक्षा द्यायला आलेल्या विद्यार्थ्याला जानवे काढण्यास सांगण्यात आले. त्याने जानवे काढण्यास नकार दिल्याने त्याला परीक्षेला बसू देण्यात आले नाही. यावरुन वाद पेटला असून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि एक कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले. विशेष म्हणजे, यापूर्वीही इतरही काही सेंटरमध्ये अशा घटना घडल्या असल्याने विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने यावरुन सरकारवर टीका केली आहे.
बिदर जिल्ह्यात साई स्फूर्ती पीयू कॉलेजमध्ये सुचिव्रत कुलकर्णी हा विद्यार्थी सीईटी परीक्षा देण्यासाठी गेला होता. यासंदर्भात सुचिव्रतने सांगितले की, मी या परीक्षा केंद्रावर पोहोचलो तेव्हा कॉलेज व्यवस्थापनाने माझी तपासणी केली. त्यांनी माझे जानवे पाहिले. त्यांनी मला ते कापायला किंवा काढून टाकायला सांगितले. जानवे काढले तरच मला परीक्षेला बसण्याची परवानगी मिळेल असेही मला बजावले. मी पाऊण तास त्यांना विनंती करत राहिलो, पण मी जानवे न काढल्याने शेवटी मला परीक्षा न देताच घरी परतावे लागले. सरकारने माझी पुन्हा परीक्षा घ्यावी किंवा मला सरकारी महाविद्यालयात प्रवेश द्यावा, अशी माझी मागणी आहे.
कर्नाटक ब्राह्मण महासभेच्या वतीने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शिवमोगा येथे आदिचुंचनागिरी पीयू कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनीही तीन विद्यार्थ्यांना असेच जानवे काढायला सांगितले होते. एका विद्यार्थ्याने याला नकार दिला तेव्हा त्याला परीक्षा देण्यास मनाई करण्यात आली. इतर दोन विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी जानवे काढले. याप्रकरणीही पोलीस तक्रार देण्यात आली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांकडे आम्ही चौकशी केली तेव्हा ते म्हणाले की, त्यांनी ही इमारत फक्त परीक्षा घेण्यापुरती दिली होती. तिथे काय घडले त्याच्याशी त्यांचा संबंध नाही तर परीक्षा केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी दावा केला की, त्यांनी कोणत्याही विद्यार्थ्याला शर्ट किंवा जानवे काढण्यास सांगितले नाही. नियमानुसार त्यांनी त्याला फक्त काशीधरा (मनगटाभोवती घातलेला धागा) काढण्यास सांगितले होते.
कर्नाटकचे उच्चशिक्षण मंत्री डॉ. एम.सी. सुधाकर यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आम्ही सर्व धर्मांच्या श्रद्धेचा आदर करतो. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. शिवमोगा व बिदर या दोन केंद्रांशिवाय इतर सर्व ठिकाणी परीक्षा सुरळीत पार पडली. शिवमोगाचे भाजपा खासदार बी.वाय. राघवेंद्र म्हणाले की, हे अन्यायकारक आहे. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. अशी घटना जाणुनबुजून घडली असो किंवा नकळत असो, हे पुन्हा घडू नये यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत. हिंदू धर्माविरुद्ध अशा घटना वारंवार घडत आहेत. जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी.