नागपूर – मोसमी पावसाने आता राज्यात जोर धरला असून भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
विदर्भात मोसमी पावसाची घोषणा झाली, पण पश्चिम विदर्भ वगळता पूर्व विदर्भात पावसाने दडी मारली होती. गेल्या आठवड्याच्या अखेरीस पूर्व विदर्भातदेखील पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस मुसळधार नसला तरीही हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी सातत्याने कोसळत आहेत. अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली असून, राज्यातही पावसाला पोषक हवामान आहे. महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने राज्याच्या किनाऱ्यालगत पुन्हा ढग जमा होऊ लागले आहेत.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातील घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा या जिल्ह्यांमध्येही ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास असेल.
अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. देशाच्या इतर भागातही मोसमी पावसाची प्रगती होत असून लवकरच मोसमी पाऊस देश व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.