विदर्भातील अनेक जिल्ह्यात गारपीट वादळी पाऊस

नागपूर
राज्यातील अनेक भागात व पूर्व विदर्भात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आला असून मंगळवारी संध्याकाळी काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि मुसळधार पाऊस झाला. वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातील काही भागाला गारपीटीचा फटका बसला असून पुढील दोन दिवस काही भागात गारपीट व वादळी पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
या पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी कापणी केलेल्या पिकांचे देखील मोठे नुकसान झाले.
हवामान विभागाने विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार मंगळवारी विदर्भात काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. वर्धा जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात गारपीट झाली. वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे वादळी वाऱ्यामुळे अनेक घरावरील पत्रे उडाले, तर अनेक झाडे कोसळली. गहू आणि चणा पिकांची काढणी शिल्लक होती. या पिकांचे मोठे नुकसान झाले. काही भागात केळीच्या बागांचेही नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मंगळवारी संध्याकाळी भंडारा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे गहू, भात, मका या पिकांसह भाजीपाल्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. दरम्यान, पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वर्धा, भंडाऱ्यासह गोंदिया जिल्ह्यात देखील गारपीट आणि वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. सडक अर्जुनी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने गहू पिकांसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.नागपूरमध्ये पारशिवनीत दुपारी झालेल्या गारपीटसह मुसळधार पाऊस झाला. चंद्रपूर जिल्ह्यात कोरपना तालुक्यात पावसासह गारपीट झाली. या पावसामुळे मिर्ची पिकाचे मोठे नुकसान झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top