उरण – रायगड जिल्ह्यातील उरणच्या पूर्व विभागात महावितरणच्या दुर्लक्षामुळे सातत्याने बत्ती गुल होण्याची घटना घडत आहे. रात्री अपरात्री,कधी कधी दिवसभर या भागात वीज खंडीत होत आहे. या वीज समस्येमुळे नागरिक पुरते हैराण झाले असून महावितरण विरोधात त्यांच्यात प्रचंड नाराजी पसरली आहे.
उरणच्या पुर्व भागातील जनतेची या वीज समस्येतून सुटका होण्यासाठी दिघोडे येथे नवीन सबस्टेशन उभारले जाणार आहे. त्यासाठी शासनातर्फे महावितरणला भाडेपट्टीने जागाही देण्यात आली आहे.पण पुढील कार्यवाही झाली नसल्याने तोपर्यंत उरणकरांना विजेचा खेळखंडोबा सहन करावा लागत आहे.प्रामुख्याने उरण तालुक्यात मागील काही दिवसांपासून विजेचा वापर वाढला आहे.वेगाने होणारे उद्योग आणि नागरी वस्ती त्यामुळे विजेची मागणी वाढली आहे.त्यामुळे कोणत्याना कोणत्या भागात वीजपुरवठ्यावर ताण येऊन वीज गायब होत आहे. दिवसरात्र कोणत्याही वेळेत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत.