वाराणसी – वाराणसीच्या केंट रेल्वेस्थानकावर काल रात्री लागलेल्या आगीत रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या २०० हून अधिक दुचाकी भस्मसात झाल्या आहेत. अग्निशमन दल, रेल्वे पोलीस व राखीव पोलीस दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले.
वाराणसी येथील केंट रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ च्या पाठीमागे रेल्वे कर्मचारी आपली दुचाकी वाहने उभी करत असतात. काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास येथे शॉर्टसर्कीट होऊन आग लागली. ती विझवण्यात आली. त्यानंतर रात्री एक वाजता पुन्हा शॉर्ट सर्कीट होऊन मोठी आग भडकली. दुचाकी गाड्यांमध्ये असलेल्या पेट्रोलमुळे आगीने रौद्र रुप धारण केले. रात्रीच्या सुमारास ही आग लागल्याने त्यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. पोलिसांना काही गाड्या वाचवण्यात यश आले असले तरी २०० हून अधिक गाड्या भस्मसात झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.