वायकरांच्या विजयावर आक्षेप! याचिका सुनावणीस कोर्टाचा नकार

मुंबई – उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव करून शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर हे निवडून आले आहेत.त्यांच्या या निकालाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.मात्र या याचिकेवर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच याचिकेत दुरुस्ती करून अन्य खंडपीठाकडे दाद मागण्याचा सल्ला न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिला.

लोकसभा निवडणुकीच्या या मतदारसंघातील निकालाला स्थगिती देण्याची मागणी करीत हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने सुनावणी होती.यावेळी सुनावणीस नकार देत
खंडपीठाने याचिकाकर्त्याला चांगलेच खडसावले आणि सबुरीचा सल्लाही दिला. यावेळी नमूद केले की, ‘‘योग्य खंडपीठाकडे दाद का मागितली नाही? ही पालिकेची निवडणूक नाही, तर लोकसभेची निवडणूक आहे.निवडणुकीसंदर्भातील प्रकरणे गंभीर असतात; तसेच लोकसभेच्या निवडणुकीची व्याप्ती मोठी आहे.त्यामुळे दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले व याचिका संबंधित खंडपीठाकडे सोपवण्यास रजिस्ट्रीला सांगितले.