वसई – वसई ख्रिस्ती धर्मप्रांताच्या बिशपपदी म्हणजेच महाधर्मगुरूपदी फादर थॉमस फ्रान्सिस डिसोझा (५२) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा दीक्षा विधी तथा पदग्रहण सोहळा नुकताच विधिवतपणे पार पडला. इटलीच्या व्हॅटीकन सिटीचे बिशप पोप यांनी फादर डिसोझा यांची नियुक्ती केली होती.मावळते धर्मगुरू फेलिक्स मच्याडो यांच्याकडून चुळणे धर्मग्रामातून आलेले धर्मगुरू थॉमस फ्रान्सिस डिसोझा यांनी वसई ख्रिस्ती धर्मप्रांताच्या महाधर्मगुरूपदाची सूत्रे स्वीकारली.
स्टेला येथील सेंट ऑगस्टीन स्कूलच्या भव्य मैदानावर दोन तास चाललेल्या या दीक्षाविधी सोहळ्यास सुमारे दहा हजार ख्रिस्ती भाविकांनी हजेरी लावली. मुख्य पुरोहित म्हणून मुंबई धर्मप्रांताचे महाधर्मगुरू (कार्डिनल) ऑजवल्ड ग्रेशियस, सहपुरोहित म्हणून गोवा-दमण धर्मप्रांताचे महामहाधर्मगुरू फीलिप मेरी फेलाव आणि वसईचे मावळते महाधर्मगुरू डॉ.फेलिक्स मच्याडो यांनी दीक्षाविधीचे पौराहित्य केले. भिवंडी,वाडा,वसई ते डहाणू- तलासरी पर्यंतच्या ३४ धर्मग्रामांचा समावेश असलेल्या वसई ख्रिस्त धर्मप्रांतात येतो.धर्मप्रांताचे नवे महागुरू (बिशप) म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर थॉमस फ्रान्सिस डिसोझा यांचे या डहाणू-धर्मग्रंमातील सर्व चर्चचे धर्मगुरू, धर्मभगिनी,धर्मबंधू आणि तमाम ख्रिस्ती भाविकांनी अभिनंदन केले.