कराची – उत्तर वझिरीस्तानच्या स्पिनवाम भागात पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लेफ्टनंट कर्नल मोहम्मद अली शौकत यांच्यासह ६ जवानांचा मृत्यू झाला, तर ६ दहशतवाद्यांना ठार करण्यात पाकिस्तानी लष्कराला यश आले. या चकमकीनंतर स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या चकमकीनंतर स्पिनवाम परिसरात पाकिस्तानी लष्कराचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले. लष्कराने संपूर्ण परिसर सील करत नाकेबंदी सुरु केली. या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. टीटीपी अफगाणिस्तानातून कारवाया करत असल्याचा आरोप पाकिस्तान सरकारने केला आहे. मात्र, याला तालिबान सरकारने नकार दिला. तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता हाती घेतल्यापासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे.