मुंबई – भाजपाने आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रकाशित केला. लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये, शेतकर्यांना किमान हमीभाव मिळावा यासाठी भावांतर योजना व कर्जमाफी अशी 25 आश्वासने संकल्पपत्रात दिली आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले की भाजपाचे संकल्पपत्र तर काँग्रेसचे स्थगितीपत्र आहे.भाजपाने त्यांचे संकल्पपत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशित केले. यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
भाजपाच्या संकल्पपत्रात लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला रु. 1500 वरुन रु. 2100 देण्यात येतील, महिला सुरक्षेसाठी 25000 महिलांचा पोलीस दलात समावेश करण्यात येईल, शेतकर्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु. 12,000 वरून रु. 15,000 दिले जातील, एमएसपीशी समन्वय साधत 20 टक्क्यांपर्यंत भावांतर योजना राबविण्यात येईल, प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा, वृद्ध पेन्शन धारकांना महिन्याला रु. 1500 ऐवजी रु. 2100 देण्यात येतील, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार, आगामी काळात 25 लाख रोजगार निर्मिती , महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना रु. 10,000 विद्यावेतन देण्यात येईल, 10 राज्यातील ग्रामीण भागात 45,000 गावांत पांधण रस्ते बांधण्यात येतील, अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला रु15,000 वेतन आणि विमा संरक्षण देण्यात येईल, वीज बिलात 30% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्यात येईल अशी आश्वासने देण्यात आली.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मविआ आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, आघाडीचा सर्व योजना सत्तेच्या लालसेपोटी आहेत. मला उद्धव ठाकरे यांना विचारायचे आहे की, ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वीर सावरकर यांच्याबद्दल दोन शब्द बोलायला सांगू शकतात का? बाळासाहेब ठाकरे यांच्या सन्मानार्थ काँग्रेसचा कोणीही नेता दोन वाक्य बोलू शकतो का? अंतर्गत विरोधादरम्यान आघाडीचे जे लोक सरकार स्थापन करण्याचे स्वप्न घेऊन निघाले आहेत. त्या लोकांना महाराष्ट्रातील जनतेने ओळखले तर बरे होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणण्याचे आमचे धोरण आहे. महाराष्ट्र फिनटेक आणि एआयचे हब होईल. या क्षेत्रात नोकरीच्या अनेक
संधी आहेत.