‘लाडकी बहीण’चे बॅनर! सभा! व्हिडिओनंतर मुख्यमंत्री ठाण्यात घरोघरी प्रचार करू लागले

ठाणे – महायुती सरकारला आगामी विधानसभा जिंकण्यासाठी फक्त ‘लाडकी बहीण’ योजनेचाच आधार राहिला आहे असे चित्र आहे. या योजनेच्या प्रचारासाठी कोट्यवधीचा खर्च करून बॅनरबाजी, मोठ्या सभा आणि तीनही पक्षांचे व्हिडिओ असे सर्व करून झाल्यावर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःच ठाण्यात घरोघरी जाऊन प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. महायुती सरकारने आणलेल्या योजना घरोघरी जाऊन सांगा, दर आठवड्याला किमान एक लाख घरी भेट पूर्ण झाल्या पाहिजेत, असे त्यांनी फर्मान सोडले असून, आज स्वतः 15 घरी जाऊन त्यांनी हा प्रचार सुरू केला.
आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा जास्तीत जास्त फायदा मिळवता यावा यासाठी महायुतीतील तीनही घटक पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. लाडकी बहीणसह सरकारच्या सर्व योजनांचा प्रसार करण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेने ‘लाडकी बहीण कुटुंब भेट’ मोहीम हाती घेतली आहे. सर्वात पहिल्यांदा मुख्यमंत्री शिंदे यांनी आज ठाण्याच्या किसन नगर येथील माजी नगरसेवक योगेश जानकर यांच्या प्रभागातील कुटुंबांची भेट घेतली. या कुटुंबियांची आस्थेने चौकशी करीत त्यांना लाडकी बहीण योजनेतील रक्कम मिळाली किंवा नाही याची शिंदे यांनी चौकशी केली. कुटुंबात ज्येष्ठ कोण आहे असे विचारताच कुटुंबातील महिलेने आपले वडील कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहेत असे सांगितले. त्यावर ज्येष्ठांसाठी असलेल्या मदत योजनांचा त्यांना लाभ घेण्यास सांगा असे मुख्यमंत्री म्हणाले. अन्नपूर्णा योजनेतून प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी स्वयंपाकाच्या गॅसचे तीन सिलिंडर मोफत मिळतात. त्याचा तुम्ही लाभ घेतला आहे का, असा प्रश्नही मुख्यमंत्री शिंदे यांनी विचारला. त्याचबरोबर एसटीच्या तिकीट भाड्यातील सवलत, मुलींना उच्चशिक्षणासाठी शंभर टक्के सवलत, सुशिक्षित बेरोजगारांसाठीची शिष्यवृत्ती योजना आदि योजनांची माहिती देत या सर्व योजनांचा लाभ घ्या आणि तुमच्या नातेवाईकांनाही योजनांची माहिती द्या, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मी सामान्य माणूस आहे. या किसान नगरमध्येच लहानाचा मोठा झालो. हे सर्व माझ्या परिवारातील आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांना भेटताना मला फार आनंद होत आहे. त्यांनी मला विनंती केली की लाडकी बहीण योजना पुढेही सुरू ठेवा. तेव्हा मी त्यांना सांगितले की, ही योजना सुरूच राहणार आहे. आम्ही त्यासाठी आर्थिक तरतूद केलेली आहे. इतकेच नाही तर आमची आर्थिक ताकद जशी वाढेल तशी आम्ही या दीड हजार रुपयांच्या रकमेतही वाढ करणार आहोत. मी याच किसान नगरमधून नगरसेवक झालो, आमदार झालो. मला यांचे दुःख कळते, गरिबीचा मला अनुभव आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर भाजपाने लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी केली होती. भाजपाच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो होते. मात्र एकाही बॅनरवर अजित पवार यांचा फोटो नव्हता. त्यामुळे या बॅनरचीच चर्चा रंगली होती. बॅनरवर फडणवीस यांचा उल्लेख देवाभाऊ असा करण्यात आला होता. देवाभाऊ, लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला देणार, असे त्यावर लिहिले होते. लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण श्रेय फक्त शिवसेना किंवा मुख्यमंत्री शिंदे यांना मिळू नये या उद्देशाने भाजपाने ही बॅनरबाजी केली. त्यात नेहमीप्रमाणे अजित पवारांना वगळले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top