लाचेच्या आरोपातून १७ वर्षांनी माजी न्यायमूर्ती नर्मल निर्दोष

अमृतसर – लाच घेण्याचा आरोप असलेल्या माजी न्यायमूर्ती निर्मल यादव यांची सीबीआयच्या विशेष सत्र न्यायालयाने तब्बल १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी सहआरोपी असलेल्या इतरांनाही निर्दोष ठरवण्यात आले. त्यातील एका आरोपीचा याआधीच मृत्यू झाला आहे.

पंजाब व हरियाणाच्या तत्कालीन न्यायमूर्ती निर्मलजीत कौर यांच्या निवासस्थानी १३ आॅगस्ट २००८ रोजी एक व्यक्ती १५ लाख रुपये रोकड घेऊन आला. त्याला पकडण्यात आल्यानंतर त्याने ही रोकड आपल्याला दुसऱ्या न्यायमूर्ती निर्मल यादव यांना द्यायची असल्याचे सांगितले. मालमत्तेच्या एका प्रकरणात आपल्या बाजूने निकाल देण्यासाठी ही रोख रक्कम पाठवल्याचे त्याने सांगितले. त्या नंतर न्यायमूर्ती निर्मल यादव यांच्यावर खटला चालला. या प्रकरणी काल निकाल देताना चंदीगढ येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने म्हटले की एक खोटी कथा रचून न्यायमूर्तींना यामध्ये फसवण्यात आले आहे. न्यायालयाने या प्रकरणातील इतर तीन आरोपी रविंदर सिंह भसीन, राजीव गुप्ता व निर्मल सिंह यांचीही निर्दोष मुक्तता केली आहे. १७ वर्षे सुरु असलेल्या या सुनावणी दरम्यान दुसरे एक आरोपी संजीव बंसल यांचा मृत्यू झाला. २०१३ मध्ये माजी न्यायमूर्ती निर्मल यादव यांनीही आपल्या विरोधात रचलेले षडयंत्र असल्याचे म्हटले होते.