लवकरच नागपूर-मुंबई, नागपूर-पुणे लोहमार्गावर धावताना दिसणार वंदे भारत स्लीपर ट्रेन्स

Vande Bharat Train: हायस्पीड ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला प्रवशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशभरात सध्या 100 पेक्षा अधिक वंदे भारत ट्रेन धावत आहे. आता लवकरच या ट्रेनच्या मार्गाचा विस्तार होणार असून, महाराष्ट्रातील प्रवाशांना देखील याचा फायदा होणार आहे.

लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन नागपूर-पुणे या लोहमार्गावर धावताना पाहायला मिळू शकते. या लोहमार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा विचार केला जात आहे. याशिवाय, नागपूर-मुंबई या लोहमार्गावरही वंदे भारत स्लीपर ट्रेन गाडी सुरू करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. , नागपूर रेल्वे विभागाने अधिकृतपणे भारतीय रेल्वे मंडळाकडे हा प्रस्ताव सादर केला आहे

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग याबाबत माहिती दिली. सध्या नागपूर स्थानकातून दररोज 125 हून अधिक ट्रेन चालवल्या जात आहेत. लवकरच नागपूरहून वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होण्याची अपेक्षा आहे.

नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई रेल्वे मार्गांवर प्रवाशांच्या संख्येत झपाट्याने वाढत झाली आहे. मात्र, सध्या उपलब्ध असलेल्या गाड्यांची संख्या वाढत्या मागणीच्या तुलनेत अपुरी पडत आहे. त्यामुळे अनेकांना हा लांबचा प्रवास रस्तेमार्गाने करावा लागतो. त्यामुळे या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. तसेच, त्यांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सोयीस्कर होईल.