लखनौ सुपर जायंट्सचा हैदराबादवर सहज विजय! निकोलस पूरनची 6 षटकारांसह 70 धावांची खेळी


हैदराबाद- हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आज झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने 23 चेंडू आणि 5 गडी राखत विजय मिळवला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर हैदराबादने निर्धारित षटकात 9 बाद 190 धावा केल्या. हे मोठे आव्हान लखनौ सुपर जायंट्सने निकोलस पूरनच्या वादळी (26 चेंडूंत 70 धावा) खेळीच्या जोरावर 16.1 षटकांत सहज पूर्ण करत आपला आयपीएलमधील पहिला विजय साजरा केला.
टॉस गमावल्यानंतर हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजीसाठी आला. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडसोबत फलंदाजीसाठी आलेल्या अभिषेक शर्मा फक्त 6 धावा करून बाद झाला. त्यानंतर गेल्या सामन्यात शतक झळकावणारा इशान किशन खातेही उघडू शकला नाही. डावाच्या तिसऱ्या षटकात शार्दुल ठाकूरने सलग दोन चेंडूंवर दोन्ही फलंदाजांना बाद केले. त्यामुळे हैदराबादची अवस्था 2 बाद 15 झाली होती. मग ट्रॅव्हिस हेडला नितीश कुमार रेड्डीने चांगली साथ दिली. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी 32 चेंडूत 61 धावांची भागीदारी केली. 28चेंडूत 47 धावा काढल्यानंतर हेड पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला प्रिन्स यादवने बोल्ड केले. त्यानंतर नितीश कुमार रेड्डीने 32, हेनरिक क्लासेनने 26 धावा करून बाद झाला. अनिकेत वर्माने 5 षटकार ठोकून 36 धावा करत आपल्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाचा वाट दिला. वर्माच्या माघारी परतल्यानंतर पॅट कमिन्सने सलग 3 षटकार ठोकत 4 चेंडूंत 18 धावा केल्या. त्यानंतर अभिनव मनोहर, मोहम्मद शमी, हर्षल पटेल आणि सिमरजीत सिंग यांनी अनुक्रमे 2, 1, नाबाद 12, नाबाद 3 धावा केल्या. परिणामी सनरायझर्स हैदराबादने निर्धारित षटकात 9 बाद 190 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना लखनौचा 4 धावांवर एडेन मार्क्रमच्या रुपात पहिला गडी बाद झाला. त्यानंतर निकोलस पूरन आणि मिचेल मार्शने संघाचा डाव सावरला. निकोलस पूरन आणि मिचेल मार्शने जोरदार फटकेबाजी सुरू केली. निकोलस पूरनने 18 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. संघाच्या 8.4 षटकांत 120 धावा असताना पूरनने 26 चेंडूंत 70 धावा करत माघारी परतला. त्याने आपल्या खेळीत 6 षटकार आणि 6 चौकार ठोकले. त्याने या वादळी खेळीच्या जोरावर संघाला विजय जवळपास पक्का करून दिला. त्याने मिचेल मार्शसोबत 126 धावांची भागिदारी केली. पूरन बाद झाल्यानंतर मिचेल मार्शने कर्णधार ऋषभ पंतची साथ घेतली. मिचेल मार्श 31 चेंडूंत 52 धावा करून तंबूत परतला. त्याने 2 षटकार आणि 7 चौकार मारले. त्यावेळी संघाने 12 षटकांत 3 बाद 149 धावा केल्या होत्या. संघाची धावसंख्या 154 वर असताना आयुष बदोनी बाद झाला. त्याने 6 चेंडूंत 6 धावा केल्या. त्यानंतर डेव्हिड मिलर फलंदाजीसाठी आला. त्यावेळी लखनौला विजयासाठी शेवटच्या 36 चेंडूंत 28 धावांची आवश्‍यकता होती. त्यानंतर पंत 15 चेंडूंत 15 धावा करून बाद झाला. अब्दुल समद डेव्हिड मिलरला साथ देण्यासाठी आला.अब्दुल समदने हैदराबादच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत आपल्या संघाला 16.1 षटकांत 190चा विजय आकडा गाठून दिला. अब्दुल समदने दोन षटकार आणि दोन चौकारांसह 8 चेंडूंत 22 नाबाद धावा केल्या.
त्यासोबत मिलर 7 चेंडूत 13 धावा केल्या.