रायगड – गेल्या काही दिवसांपासून रोहा तालुक्यातील परतीचा पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाने भात कापणीच्या हंगामास सुरुवात केली आहे.मात्र भात कापणीसाठी मजुरांचा मोठा तुटवडा भासत असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
यंदा परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान केले होते.या सर्व गोष्टीतून सावरून पुन्हा शेतकरी कापणी,झोडणी आणि मळणीच्या कामात व्यस्त झाले आहेत.परंतु अनेक ठिकाणी मजुरांचा तुटवडा भासत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.यंदा पावसाळी हंगामात शेतकऱ्यांनी भातशेतीची लागवड केली.पाऊस लांबल्याने मागील सहा महिन्यांत सर्व संकटाचा सामना करून भातशेतीही चांगलीच तरारली आहे.
सर्वत्र दिपावली सणाची धामधूम सुरू असली तरी आपापली शेतीची कामे लवकर कशी पूर्ण होतील, यामध्ये शेतकरी वर्ग पुरता गुंतून गेला आहे.एकाच वेळी सर्वत्र भातशेती कापणीच्या हंगामाला सुरूवात झाली असल्याने मजुरांचाही तुटवडा भासू लागला असल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे.