रोहा – केंद्र सरकारने रोहा रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाडयांना थांबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. प्रवासी वर्गांने व प्रवासी संघटनांनी खासदार सुनील तटकरे यांची भेट घेत रोहा रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या जलद गाड्या थांबाव्यात अशी मागणी केली होती. त्यानुसार खासदार तटकरे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
रोहा रेल्वे स्थानकात जलद गाड्यांना थांबा देण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने लोकमान्य टिळक मडगाव एक्सप्रेस, कोचुवेली-चंदीगड केरळा संपर्क क्रांती एक्सप्रेस, कोचुवेली-इंदूर एक्सप्रेस, हिसार-कोयंबतूर एसी एक्सप्रेस आणि दादर-तिरुनेलवेली एक्सप्रेस या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे.या गाड्यांना रोहा स्थानकावर व्यावसायिक थांबा मिळाला आहे. या निर्णयाचा स्थानिक नागरिकांना मोठा फायदा होणार असून प्रवासासाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील. वेळेची बचत होऊन प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुलभ होणार आहे. विशेषतः विद्यार्थी, कामगार, व्यापारी आणि प्रवास करणार्या सर्वसामान्य जनतेसाठी ही सुविधा खूप महत्त्वाची ठरणार आहे. खासदार तटकरे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे या मागणीसाठी पत्रव्यवहार केला होता. तसेच त्यांची प्रत्यक्ष भेटून याबाबत चर्चा केली होती. त्यांची ही मागणी पूर्ण झाल्याने त्यांनी रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले आहेत.