रेल्वे प्रवाशांसाठी लाँच झाले खास ‘SwaRail’ सुपर अ‍ॅप, आता एकाच ठिकाणी मिळणार ट्रेनशी संबंधित सर्व सुविधा

 जर तुम्ही नियमित ट्रेनने  प्रवास करणारे असाल, तर भारतीय रेल्वेच्या विविध सेवांसाठी अनेक अ‍ॅप्सचा वापर करावा लागत असेल. मात्र, आता तुम्हाला रेल्वेशी संबंधित कामासाठी वेगवेगळे अ‍ॅप्स वापरण्याची गरज पडणार नाही. रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘SwaRail’ नावाचे सुपर अ‍ॅप लाँच केले आहे. या सुपर अ‍ॅपच्या मदतीने आता प्रवाशांची सर्व कामे एकाच ठिकाणी होतील.

‘SwaRail’ सुपर अ‍ॅपला सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स (CRIS) द्वारे तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने तिकीट बुकिंगपासून ते पीएनआर स्टेट्स तपासण्यापर्यंत आणि रेल्वेत खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यापर्यंत अनेक सेवा एका ठिकाणी मिळतील.

आतापर्यंत रेल्वेच्या सुविधांचा वापर करण्यासाठी वेगवेगळ्या अ‍ॅप्सचा वापर करावा लागत असे. मात्र, आता ‘SwaRail’ च्या मदतीने आरक्षित तिकीटं, अनारक्षित तिकीट, ट्रेन चौकशी, प्लॅटफॉर्म तिकीट, पार्सल बुकिंग आणि तक्रार निवारण इत्यादी सुविधा वापरता येतील. सोप्या इंटरफेससह येणाऱ्या या अ‍ॅपमध्येच सर्व सुविधा एका क्लिकवर

उपलब्ध होतील.

सध्या ‘SwaRail’ अ‍ॅप बीटा टेस्टिंगमध्ये आहे. मात्र, लवकरच ते सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल. एकदा हे अ‍ॅप सार्वजनिक झाल्यावर तुम्ही ते Google Play Store आणि Apple App Store वरून डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर, तुम्ही नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करू शकता किंवा तुमच्या Rail Connect, UTS Mobile अ‍ॅपच्या यूजरनेम व पासवर्डचा वापर करूनही लॉग इन करता येईल. लॉग इन केल्यानंतर तुमच्या मागील प्रवासाची देखील माहिती यात मिळेल.