नवी दिल्ली – केंद्र सरकारने नॅशनल काउंसिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चच्या महासंचालक पुनम गुप्ता यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या उपगव्हर्नर पदावर नियुक्ती केली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे उपगव्हर्नर एम. डी. पात्रा यांनी जानेवारीमध्ये राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने उपगव्हर्नर पदावर पुनम गुप्ता यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. पुनम गुप्ता या पदाचा कारभार स्वीकारल्यापासून तीन वर्षांसाठी उपगव्हर्नर पदाची जबाबदारी सांभाळतील. पुनम गुप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्य आहेत. वित्त आयोगाच्या १६ व्या सल्लागार समितीच्या संयोजक म्हणूनही त्या कार्यरत आहेत.
