रिक्षा चालकांसाठी १० लाखांचा विमा! अरविंद केजरीवालांची घोषणा

नवी दिल्ली- दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रिक्षा बांधवांसाठी अरविंद केजरीवाल यांनी ५ मोठ्या घोषणा केल्या. यात दिल्लीतील रिक्षा चालकांसाठी १० लाख रुपयांचा जीवन विमा आणि ५ लाखाचा अपघाती विमा यांचा समावेश आहे. तर रिक्षा चालकांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही दिल्ली सरकार उचलणार आहे. तसेच रिक्षा चालकाच्या मुलीच्या लग्नासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. एवढेच नाही तर वर्षातून रिक्षा चालकांच्या दोन गणवेशांसाठी २५०० रुपये बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. केजरीवाल यांनी पूछो ॲपची पुन्हा सुरुवात करण्याचे आश्वासनही दिले आहे. पूछो ॲपद्वारे दिल्ली इंटिग्रेटेड मल्टी-मॉडेल ट्रान्झिट सिस्टमद्वारे विकसित केलेल्या डेटाबेसपर्यंत पोहोचता येते. यामुळे लोकांना नोंदणीकृत ऑटो चालकांना कॉल करण्याची सुविधा मिळते.