राहुल गांधी यांचा विशेष दौरा! परभणी पीडिताच्या घरी भेट

परभणी – लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणीत जाऊन पोलीस कोठडीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी सूर्यवंशी कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांच्याशी 20-25 मिनिटे चर्चा करून सविस्तर माहिती जाणून घेतली. या भेटीवेळी भावुक झालेल्या सूर्यवंशी कुटुंबाने आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी राहुल गांधींकडे केली. त्यानंतर पोलिसांनीच सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली. त्यांच्या मृत्यूसाठी देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केल्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.
या भेटीवेळी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार प्रणिती शिंदे, माजी विरोधीपक्ष विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, प्रज्ञा सातव, संजय जाधव, नितीन राऊत, अमित देशमुख आदी नेते उपस्थित होते. राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, मी सूर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी मला सोमनाथचा पोस्टमार्टम रिपोर्ट, व्हिडिओ, छायाचित्रे दाखवली. यावरून त्याचा मृत्यू 100 टक्के कोठडीत असतानाच झाल्याचे दिसून येते. त्यांची हत्या करण्यात आली आहे आणि मुख्यमंत्री त्याच्या मृत्यूबद्दल विधानसभेत खोटे बोलले. कारण तो दलित होता आणि संविधानाचे रक्षण करत होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. त्यांची विचारधारा जबाबदार आहे. कारण ही संघाची विचारधारा असून ती संविधान संपवणारी विचारधारा आहे. ज्या लोकांनी हे केले आहे, त्यांना शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे. मी यावर समाधानी नाही. या लोकांना मारण्यात आले. सोमनाथची हत्या केली. त्यामुळे आरोपींवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. यावेळी या प्रकरणाचे राजकारण होत असल्याबद्दल राहुल गांधींना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधी संतापून म्हणाले की, हे राजकारण नाही. या प्रकरणी कोणतेही राजकारण केले जात नाही. येथे हत्या झाली आहे. त्यामुळे न्याय मिळाला पाहिजे. योग्य ती कारवाई झाली पाहिजे. राहुल गांधींच्या भेटीनंतर सोमनाथ सूर्यवंशी यांची आई म्हणाल्या की, ज्याने माझ्या मुलाला मारले त्यांना कठोर शिक्षा द्या. त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आम्ही राहुल गांधी यांच्याकडे केली. त्यावर राहुल गांधी यांनी कायदेशीर कठोर कारवाई होईल, असे उत्तर दिले. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधींनी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांचीही भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सूर्यवंशी यांच्या अंतिम संस्कारावेळी वाकोडे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. वाकोडे यांनी हिंसाचार थांबवण्यात मोठी भूमिका बजावली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण दडपण्याचे पाप सरकार करत आहे. सूर्यवंशी यांचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. पण आम्ही वस्तुस्थिती जाणून घेतली आहे. सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळे झाल्याचे पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. सोमनाथ सूर्यवंशी व संतोष देशमुख प्रकरणी अधिवेशनात प्रश्न मांडला, पण मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला खोटी माहिती दिली. काँग्रेस यासंदर्भात मुख्यमंत्र्यांविरोधात विशेषाधिकार प्रस्ताव आणणार आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकर्‍यांना सोडणार नाही. मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक समाजावर भाजपा सरकार अत्याचार करत आहे. काँग्रेस या अत्याचाराविरोधात आवाज उठवून पीडित कुटुंबांना न्याय देण्याचे काम करेल. राहुल गांधी यांच्या परभणी भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. ते म्हणाले की, राहुल गांधी यांची ही राजकीय भेट होती. जाती-जातीमध्ये भेद निर्माण करण्याचे काम ते करत असतात. परभणी प्रकरणाची आम्ही न्यायालयीन चौकशी करण्याची घोषण केली आहे. त्यात सत्य बाहेर येईल. त्यात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले तर कठोरात कठोर कारवाई केली जाईल.

राहुल गांधी निळा टी-शर्ट
परिधान करून परभणीत

डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधी हे पांढर्‍या टी-शर्ट ऐवजी निळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान करत आहेत. आजही ते निळा टी- शर्ट परिधान करून परभणीत आले होते. यावरून माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्यावर टीका केली की, राहुल गांधींना महाराष्ट्र कधीच कळला नाही. नुसता कपड्यांचा रंग निळा असून, चालत नाही. शुद्ध विचार आत असणे गरजेचे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top