लखनौ- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्व प्रकरणावर आज अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात सुनावणी झाली नाही. याप्रकरणाची पुढील सुनावणी १९ डिसेंबरला होणार आहे.
यापूर्वी २४ ऑक्टोबरला न्यायालयात सुनावणी झाली होती. न्यायमूर्ती राजन रॉय आणि न्यायमूर्ती ओम प्रकाश शुक्ला यांच्या खंडपीठाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) सूर्यभान पांडे यांना याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून माहिती घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने उत्तर दाखल केले.
राहुल गांधींच्या नागरिकत्वावरुन रायबरेली लोकसभा निवडणुकीला आव्हान देणारी जनहित याचिका ३ महिन्यांपूर्वी कर्नाटकचे एस. विघ्नेश शिशिर यांनी उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात दाखल केली होती. यामध्ये एस. विघ्नेश शिशिर यांनी सांगितले की, राहूल गांधींकडे अशी अनेक कागदपत्रे आणि ब्रिटिश सरकारचे काही ई-मेल आहेत, ज्यावरून राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक असल्याचे सिद्ध होते. या आधारावर त्यांची निवडणूक रद्द करण्यात यावी.