भोपाळ – मध्यप्रदेशच्या भोपाळमधील एका दाम्पत्याने काल गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या दाम्पत्याने लिहिलेल्या पत्रावरून या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. या दाम्पत्याच्या चिमुरड्या मुलाने राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान त्यांना आपल्या पिगी बँकमध्ये जमा केलेले पैसे मदत निधीसाठी दिले होते. त्यावरून काँग्रेसने अंमलबजावणी संचलनालयावर (ईडी) आरोप केला. ईडीच्या दबावामुळे दाम्पत्याने आत्महत्या केली असा आरोप काँग्रेसने केला. तर ईडीने आरोप फेटाळून लावताना दाम्पत्य सराईत गुन्हेगार असल्याचा पलटवार केला.
भोपाळपासून दीड तासाच्या अंतरावर असलेल्या आष्टा शहरातील मनोज आणि नेहा परमार या दाम्पत्याने काल गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी पंतप्रधान, सरन्यायाधीश, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, राज्याचे पोलीस महासंचालक, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि मध्य प्रदेश काँग्रेस कमिटी यांना उद्देशून एक विस्तृत पत्र लिहिले आहे. या पत्रात काँग्रेसचे समर्थक असल्यामुळे ईडीने आपल्या संपूर्ण कुटुंबाला वेठीस धरल्याचा आरोप दाम्पत्याने केला आहे.
या पत्राच्या आधारे काँग्रेसने दाम्पत्याच्या आत्महत्येस ईडी कारणीभूत असल्याचा आरोप केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून परमार दाम्पत्यावर अनेक गुन्हे यापूर्वी दाखल असून मनोज परमार यांनी कर्ज बुडविल्यासंबंधीच्या एका खटल्यात ७ वर्षे कारावासही भोगला आहे,असा पलटवार ईडीने केला.