Rashtrapati Bhavan: राष्ट्रपती भवन-देशातील सर्वात शक्तिशाली इमारतींपैकी एक. येथूनच देशातील प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होतो. आता याच भवनात पहिल्यांदा विवाहसोहळा पार पडणार आहे. सीआरपीएफ अधिकारी पूनम गुप्ता (Poonam Gupta) या राष्ट्रपती भवनात विवाह करणाऱ्या पहिल्या व्यक्ती ठरणार आहेत.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनाच्या परिसरात विवाह सोहळ्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. येत्या 12 फेब्रुवारीला राष्ट्रपती भवनात त्यांचा विवाह पार पडणार आहे. त्या जम्मू-कश्मीरमध्ये नियुक्त असलेल्या सीआरपीएफ असिस्टंट कमांडंट अवनीश कुमार यांच्याशी लग्न करणार आहेत.
पूनम गुप्ता या भारताच्या इतिहासातील पहिल्या व्यक्ती ठरणार आहेत ज्या राष्ट्रपती भवनात विवाहबद्ध होतील. त्यांच्या उल्लेखनीय सेवेस प्रभावित होऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वतः वैयक्तिकरित्या विवाहासाठी मंजुरी दिली आहे. 12 फेब्रुवारीला मदर तेरेसा क्राउन कॉम्प्लेक्समध्ये हे लग्न पार पडेल.
कोण आहेत पूनम गुप्ता?
पूनम गुप्ता या केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये सहाय्यक कमांडंट म्हणून कार्यरत आहेत. 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये त्यांनी CRPF च्या महिला तुकडीचे नेतृत्त्व केले होते. सध्या त्या राष्ट्रपती भवनात पीएसओ म्हणून नियुक्त आहेत.
त्यांनी ग्वाल्हेरच्या जीवाजी विद्यापीठातून गणितात पदवी, इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण आणि BEd पूर्ण केले आहे. वर्ष 2018 मध्ये UPSC CAPF परीक्षेत 81 वा क्रमांक मिळवला होता. त्या सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून सीआरपीओ यूनिफॉर्ममधील फोटो अनेकदा शेअर करतात.