रायगड – जुलै महिन्यात आतापर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील बारा तालुक्यातील १८२ गावांना पुराचा फटका बसला आहे. पावसामुळे १८२ गावांतील २ हजार ९४६ शेतकर्यांच्या ७४६ हेक्टर क्षेत्रावरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा हा प्राथमिक अंदाज आहे.
पेण, अलिबाग, रोहा, महाड या तालुक्यांमध्ये नुकसानीचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांपासून सखल भागातील भातशेतीत पाणी साचले आहे. नुकतेच लावलेली रोपे कुजल्याने दुबार लावणीचे संकट ओढवल्याचे शेतकरी सांगतात. पावसाचा जोर कमी झाल्यावर खलाटीतील पाणी कमी होऊ लागल्याने झालेल्या नुकसानीचा अंदाज येू लागला आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. याचबरोबर खालापूर, कर्जत, सुधागड, माणगाव या तालुक्यांमध्येही भातशेतीचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत १२ तालुक्यांमधील नजर पाहणी अहवाल सादर झाले आहेत. श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड, पोलादपूर, सुधागड या डोंगराळ तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. डोंगर उतारावरील शेतीत पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती, दगडगोटे वाहून आल्याने मोठे नुकसान झाल्याच्या तक्रारी शेतकर्यांनी संबंधित कृषी अधिकार्यांकडे नोंदवल्या आहेत.