महाड- छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड किल्ल्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात महायुतीतील मानापमान नाट्य पाहायला मिळाले. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एकनाथ शिंदे यांना भाषणाची संधी दिली. तर अजित पवार यांना डावलले. कार्यक्रमाच्या नियोजनानुसार भाषण करणाऱ्यांच्या यादीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नावे नव्हती. परंतु शिंदे यांची नाराजी टाळण्यासाठी फडणवीस यांनी ऐनवेळी त्यांना भाषण करण्याचा आग्रह केला. मात्र, अमित शहा आणि फडणवीस यांनी फक्त एकनाथ शिंदे यांनाच भाषण करायला सांगितले यावरून चर्चा होत राहिली.
रायगडावरील कार्यक्रमात सूत्रसंचालकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव भाषणासाठी पुकारले. परंतु अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेकडे बोट दाखवत ते भाषण करतील असे सांगितले. त्यांनी एकनाथ शिंदे यांना भाषणाचा आग्रह केला. त्यानंतर एकनाथ शिंदे उठले. त्यांनी पाच मिनिटांत भाषण आटोपले. अजित पवार हा प्रकार बघतच बसले. शिंदे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. अजित पवार यांना पाच मिनिटेही भाषण करायची संधी मिळाली नाही. रायगडावरील कार्यक्रम संपल्यावर याचीच सर्वत्र चर्चा होती. रायगड दौरा संपल्यानंतर अमित शहा हे मुंबईत कार्यक्रमाला आले तेव्हा अजित पवार त्यांच्यासह नव्हते. ते रयत संस्थेच्या बैठकीला साताऱ्याला रवाना झाले. अमित शहा यांच्यासह मुंबईला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच आले. नंतर अजित पवार यांनी वेळ कमी असल्याने भाषण केले नाही, अशी सावरासारव केली.
अमित शहा आज सकाळी पुण्याहून हेलीकॉप्टरने रायगडच्या पायथ्याशी पाचाडला दाखल झाले. तिथे त्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ते रोप-वेने रायगड किल्ल्यावर पोहोचले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचे पूजन करत त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी अमित शहा यांचा शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ, सन्मानचिन्ह आणि पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. रायगडावरील या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, मंत्री भरत गोगावले, मंत्री अदिती तटकरे आणि मंत्री आशिष शेलार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे उपस्थित होते. यावेळी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने अशोक बांगर , होळकर घराण्याचे उदयसिंह राजे होळकर , लेफ्टनंट जनरल संजय कुळकर्णी आणि नीलकंठ रामदास पाटील यांना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या भाषणात शिवाजी महाराज आणि रायगड किल्ल्याची थोरवी कथन करताना अमित शहा म्हणाले की, शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला ती हीच जागा आहे. शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास घेतला ती ही जागा आहे. बालशिवाजीपासून ते छत्रपतीपर्यंतचा इतिहास या पवित्र भूमित आहे. रायगड पर्यटन नव्हे तर प्रेरणास्थळ बनवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. सातवीपासून ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी येऊन महाराजांच्या कार्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला माझी विनंती आहे की महाराजांना महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका. कारण देशच नव्हे तर सगळे जग शिवरायांपासून प्रेरणा घेऊ शकते. अमित शहा पुढे म्हणाले की, मी इथे भाषण करायला किंवा राजकारण करायला आलो नाही. मला शिवरायांच्या स्मृतींची अनुभूती व्हावी म्हणून आलो आहे. ऐतिहासिक स्थळावर सुवर्ण सिंहासन स्थापन झाले तेव्हाचे वर्णन करणे खरेच अवघड आहे. चारही बाजूने शत्रूंनी घेरलेल्या महाराष्ट्रात त्यांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले. त्याच्या सीमा दिल्ली ते अटकपर्यंत पोहोचल्या. स्वराज्याची संकल्पना मनात येणेदेखील त्या काळात अवघड होते . मी अनेक नायकांची पुस्तके वाचली आहेत. मात्र, अपराजित सेना निर्माण करणे छत्रपतींशिवाय कोणीही करू शकले नाही. महाराजांनी आपल्याला 200 वर्षांच्या मुघलशाहीतून स्वतंत्र केले. बंगाल, तामिळनाडू, दिल्लीपर्यंत आपले स्वराज्य स्थापून स्वधर्म वाचवला. स्वतःला आलमगीर म्हणवणाऱ्या औरंगजेबाचा महाराष्ट्रात पराभव झाला. त्याची कबरदेखील येथे बांधण्यात आली.
शिवचरित्र प्रत्येक भारतीयाला शिकवले गेले पाहिजे. प्रत्येक मुलाला शिकवले पाहिजे. म्हणूनच सातवीपासून ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी आले पाहिजेत अशी व्यवस्था आपण करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी महाराजांच्या कार्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. शिवाजी महाराजांचा अर्थ समर्पण, बलिदान, शौर्य , स्वाभिमान, स्वराज्य राखण्याची जिद्द आहे. या भूमीत जो कोणी येतो तो नवीन ऊर्जा आणि चेतना घेऊन जातो.
